शिरोळमधील अनेक गावांची पूरकाळात चोहोबाजूंनी कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:24 AM2021-07-30T04:24:16+5:302021-07-30T04:24:16+5:30

कोल्हापूर : दरवर्षी महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक गावांची पूरकोंडी होत असल्याचे स्पष्ट होत आहे. नृसिंहवाडीजवळील ...

Many villages in Shirol were flooded during the floods | शिरोळमधील अनेक गावांची पूरकाळात चोहोबाजूंनी कोंडी

शिरोळमधील अनेक गावांची पूरकाळात चोहोबाजूंनी कोंडी

Next

कोल्हापूर : दरवर्षी महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक गावांची पूरकोंडी होत असल्याचे स्पष्ट होत आहे. नृसिंहवाडीजवळील पुलावर मोठे पाणी आल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटत आहे. तर दुसरीकडे हुपरी, रेंदाळकडूनही रस्ते बंद होत असल्याने दक्षिणेकडील काही गावांना पाणी उतरल्याशिवाय जाता येत नाही. केवळ बोटी आणि हेलिकॉप्टर मार्गाने जाता येत असल्याने शासन, प्रशासन या गावांमध्ये पोहाेचण्यावर मर्यादा येत आहेत.

नृसिंहवाडीजवळ पाणी वाढले की, औरवाड, गौरवाड, शेडशाळ, कवठेगुलंद, आलास, बुबनाळ, औरवाड या गावांचा संपर्क नेहमी तुटतो. तर दक्षिणेकडील राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर, जुने दानवाड या गावांनाही पाणी उतरल्याशिवाय जाता येत नाही.

परिणामी, राजकीय नेते आणि अधिकारी प्रामुख्याने शिरोळ आणि जवळच्याच पूरग्रस्त गावांना आणि शिरोळमधील पूरग्रस्तांच्या छावण्यांना भेट देतात, असे चित्र आहे. खिद्रापूरचे सरपंच हैदरखान मोकाशी म्हणाले, पाणी वाढण्याआधी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर येऊन गेले होते. आदल्या दिवशी अधिकारीही आले होते. परंतु, पाणी वाढल्यानंतर इकडे येण्यासाठी मार्गच नसल्याने कुणी येण्याचा प्रश्नच येत नाही.

जुने दानवाडमधील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील म्हणाले, १०० टक्के गाव स्थलांतरित करण्यात आले आहे. गुरूवारी रात्रीनंतर पाणी वाढायला सुरूवात झाली. पाणी उतरल्यानंतर मंत्री यड्रावकर आणि खासदार धैर्यशील माने येऊन गेले आहेत. १०० टक्के गाव पूरबाधित झाल्याने सर्वांना अनुदान मिळण्याची गरज आहे.

राजापूरवाडीचे सरपंच विजय एकसंबे म्हणाले, शिरोळ आणि इचलकरंजी इकडून एकदा पाणी वाढल्यानंतर मार्ग बंद झाला की मग गावाकडे येता येत नाही. केवळ बोटीच्या माध्यमातून इकडे येता येते. त्यामुळे पूर ओसरल्याशिवाय शक्यतो इकडे सर्वांच्याच येण्यावर मर्यादा पडतात.

चौकट

दक्षतेमुळे जीवितहानी नाही

२००५, २०१९च्या पुरांचा फटका बसल्यानंतर ग्रामस्थ दक्ष झाले आहेत. प्रत्येक गावात कोयनेपासून राधानगरीच्या पाणी विसर्गावर आणि बंधाऱ्यांच्या पातळीवर लक्ष असते. त्यानुसार ग्रामपंचायतीकडून सूचना देण्यात येतात. त्यामुळे ग्रामस्थ जनावरांसह वेळेत बाहेर पडतात. या दक्षतेमुळेच जीवितहानी होण्यावर आता मर्यादा आल्या आहेत. पूरकाळात स्थलांतर करावे लागणार, ही मानसिकता या परिसरातील ग्रामस्थांनी पक्की केली आहे.

Web Title: Many villages in Shirol were flooded during the floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.