मैनुद्दीन दाखविणार आज प्रात्यक्षिक
By Admin | Updated: March 20, 2016 01:03 IST2016-03-20T01:02:04+5:302016-03-20T01:03:56+5:30
मोटारसायकल, कटावणी जप्त : वारणा शिक्षक कॉलनीतील चोरीप्रकरण

मैनुद्दीन दाखविणार आज प्रात्यक्षिक
कोल्हापूर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनीतील तीन कोटी रुपयांची चोरी कशी केली याचे प्रात्यक्षिक आज, रविवारी चोरटा मैनुद्दीन मुल्ला पोलिसांना दाखविणार आहे. त्याच्याकडून गुन्ह्यांत वापरलेली मोटारसायकल व कटावणी शनिवारी पोलिसांनी हस्तगत केली. त्याचा फरार साथीदार रेहान अन्सारी याला लवकरच अटक करू, अशी माहिती तपास अधिकारी विकास जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये मैनुद्दीन मुल्ला याच्याकडे तीन कोटींची रक्कम मिळून आल्यानंतर वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनी बिल्डिंग नंबर ५ मध्ये चोरी झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक व मल्टी डेव्हलपर्सचे मालक झुंजार माधवराव सरनोबत यांनी कोडोली पोलिसांत फिर्याद दिली. कोडोली पोलिसांनी कॉलनीमधील रूमची झडती घेतली असता आणखी १ कोटी ३१ लाख २९ हजार रुपये मिळून आले. सुमारे सव्वाचार कोटींची बेहिशेबी रक्कम मिळून आल्याने या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक करीत आहे. शनिवारी पथकाने सांगली पोलिसांच्या ताब्यातून मैनुद्दीन याने वापरलेली मोटारसायकल व कटावणी हस्तगत केली. मैनुद्दीन याच्याकडे चौकशी केली असता, त्याने आपल्या जबाबात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. मैनुद्दीन याने सकाळी साडेदहाच्या सुमारास चोरी केली. रस्त्याकडेला ही इमारत आहे. त्याच्यासमोरच शिक्षण मंडळाचे कार्यालय आहे. कॉलेज विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांची याठिकाणी वर्दळ असते. कॉलेज परिसरात प्रवेश करायचा असेल तर प्रवेशद्वारातून सुरक्षारक्षकांच्या गराड्यातून आत यावे लागते. असे असतानाही त्याने चोरी केली. ती कशी केली, याची रंगीत तालीम आज, रविवारी पोलिस घेणार आहेत.
कार घेण्यापूर्वीच पोलिसांच्या जाळ्यात
चोरीनंतर कोट्यवधी रुपये मिळाल्याने मैनुद्दीन भारावून गेला होता. तो यापूर्वी एका इनोव्हा गाडीवर चालक म्हणून काम करीत होता. त्या मालकास त्याने भेटून ही गाडी मला खरेदी करायची आहे, कितीला देणार सांगा, असे म्हणाला. त्यावर मालकाने आठ लाख किंमत सांगितली. मैनुद्दीन याने ७ लाख ८० हजार रुपये देतो आणि उद्या गाडी घेऊन जातो, असे सांगितले आणि गाडी घेण्यापूर्वीच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.