मनोरुग्ण ‘हौसा’ला हवाय माणुसकीचा आसरा
By Admin | Updated: April 29, 2016 00:52 IST2016-04-28T23:28:16+5:302016-04-29T00:52:03+5:30
पुढाकाराची गरज : उदगावमध्ये पाच वर्षांपासून रस्त्यावरच संसार

मनोरुग्ण ‘हौसा’ला हवाय माणुसकीचा आसरा
संतोष बामणे - जयसिंगपूर--ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची तमा न बाळगता गेल्या पाच वर्षांपासून एकाच ठिकाणी आपला ठिय्या मांडून असलेली उदगाव-रोहिदासनगर (ता़ शिरोळ) येथील मनोरुग्ण हौसाबाई रस्त्याच्या कडेला आपला संसार मांडून बसलेली असते़ या परिसरात तिच्या नातेवाइकांचा गोतावळा असूनसुद्धा तिला असे जीवन जगावे लागत आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे़ मात्र, तिच्या उपचारासाठी सामाजिक संस्थांबरोबर कोण पुढाकार घेऊन मदतीचा हात देण्यासाठी पुढे येईल का? हाच प्रश्न लागून राहिला आहे़येथील रोहिदास नगरमधील एका रस्त्याच्या कडेला भूपाल ठोमके यांच्या घरासमोरच गेल्या पाच वर्षांपासून ती राहत असून, तिच्याजवळ आपले साहित्य, स्वत:चा अवतार वेतारलेल्या अवस्थेत व डोक्यावर केस न विंचरल्यामुळे झालेला केसांचा गुंता अशा अवस्थेत कोण एकवेळचे जेवण देते किंवा नाही, असे जीवन जगत असताना माणुसकीच्या नात्याने एक-दोन वेळचा अन्नाचा घास गावातील व शेजारचे नागरिक देत आहेत़ मात्र, तिच्या जिव्हाळ्याच्या लोकांनी तिला टाकल्याचे दिसून येते़
२००५ ला आपल्या आयुष्याच्या संसार तुटला़ तिच्या मागे मूल ना बाळ, अशा परिस्थितीत तिला एक मानसिक धक्का बसून ती मनोरुग्ण बनली. काही वेळा जुन्या आठवणींतून ती अश्रू ओंघाळत बसते़ सध्या राहत असलेल्या रस्त्यालगत परिसरातील जागा स्वच्छ ठेवते. मात्र, या पाच वर्षांत ऊन व पावसाची तमा न बाळगता रस्त्यावरच असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांचे तिच्याकडे लक्ष जाते़ मात्र, तिला उपचारासाठी दाखल करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही़ त्यामुळे तिला माणुसकीची गरज आहे़
उपचार करणे गरजेचे
मनोरुग्ण हौसाला एक-दोन वेळचे जेवण माणुसकीच्या नात्याने काही नागरिक देतात, तर काही नागरिक फक्त तिला बघून पुढे निघून जातात़ अशा परिस्थितीत हौसाला सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मनोरुग्णाच्या उपचारासाठी पुढाकार घेऊन तिला रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे़
उदगाव (ता़ शिरोळ) येथील रोहिदास नगरमध्ये पाच वर्षांपासून एकाच ठिकाणी राहणारी मनोरुग्ण हौसाबाई.