मैनुद्दीनने दाखविले चोरीचे प्रात्यक्षिक

By Admin | Updated: March 23, 2016 00:26 IST2016-03-23T00:22:36+5:302016-03-23T00:26:33+5:30

चोरी प्रकरण : वारणानगर ते सांगली-मिरज रस्त्यावरील थरार

Manidane demonstrated stolen demonstration | मैनुद्दीनने दाखविले चोरीचे प्रात्यक्षिक

मैनुद्दीनने दाखविले चोरीचे प्रात्यक्षिक

कोल्हापूर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनीतील तीन कोटी रुपयांची भरदिवसा चोरी कशी केली, त्याचे प्रात्यक्षिक मंगळवारी चोरटा मैनुद्दीन मुल्ला याने दाखविले. तीन कोटी रुपये पोत्यात भरून वारणा ते सांगली-मिरजपर्यंत मोटारसायकलवरून कसा गेलो, हा थरारक प्रवास मैनुद्दीनने पोलिसांना दाखविला. त्याचे हे धाडस पाहून पोलिसही अचंबित झाले.
मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये मैनुद्दीन मुल्ला याच्याकडे तीन कोटींची रक्कम मिळाल्यानंतर वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनी बिल्डिंग नंबर ५ मध्ये चोरी झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी मैनुद्दीन मुल्ला याला अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्याच्याकडून मोटारसायकल व कटावणी जप्त केली. तसेच वारणा शिक्षण मंडळातील लिपिक, शिपाई, आदी पाचजणांकडे चौकशी करून त्यांचे जबाब घेतले.
परिसरातील काही सुरक्षारक्षक, नागरिक यांचेही साक्षीदार म्हणून जबाब घेतले. मैनुद्दीन याने सकाळी साडेदहाच्या सुमारास चोरी केली. रस्त्याकडेला ही इमारत आहे. त्याच्यासमोरच शिक्षण मंडळाचे कार्यालय आहे. कॉलेज विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांची या ठिकाणी वर्दळ असते. कॉलेज परिसरात प्रवेश करायचा असेल तर प्रवेशद्वारातून सुरक्षारक्षकांच्या गराड्यातून आत यावे लागते. असे असतानाही त्याने चोरी केली. ती कशी केली, याचे प्रात्यक्षिक मंगळवारी दुपारी घेतले. वारणानगर ते सांगली-मिरजपर्यंत तो कोणत्या मार्गाने आला आणि गेला त्या मार्गावरून त्याला फिरवून पोलिसांनी माहिती घेतली. त्याचा फरार साथीदार रेहान अन्सारी याचा शोध पोलिस घेत आहेत. सांगली पोलिसांनी हस्तगत केलेली तीन कोटींची रक्कम ते मंगळवारी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात देणार होते; परंतु अद्याप त्यांनी ही रक्कम दिलेली नाही.
या संदर्भात कोल्हापूर पोलिसांनी रक्कम ताब्यात देण्यासाठी सांगली पोलिसांना दोन दिवसांपूर्वी पत्रव्यवहार केला आहे.

उदगाव रेल्वे पुलाखाली पाच तास थांबून
मैनुद्दीन मुल्ला याने वारणा शिक्षक कॉलनी येथून चोरी करून मोटारसायकलवरून तो उदगाव गावच्या हद्दीत आला. दिवस असल्याने कोणाला तरी शंका येईल म्हणून येथील रेल्वे पुलाखाली त्याने पैशांचे पोते सुमारे पाच तास दडवून ठेवले. अंधार पडल्यानंतर तो मिरजेला बहिणीकडे आला.

आज पुन्हा न्यायालयात
मैनुद्दीन मुल्ला याच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आहे. त्यामुळे त्याला आज, बुधवारी दुपारी पन्हाळा न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याला एकूण पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्याने त्याची बिंदू चौक कारागृहात रवानगी होण्याची शक्यता आहे.

अभय शोरूम मालकासह कर्मचाऱ्यांची चौकशी
मैनुद्दीन मुल्ला याने सांगली येथील अभय शोरूम येथून बुलेट मोटारसायकल खरेदी केली. या शोरूमचे मालक दर्शन पाठक व काही कर्मचाऱ्यांची चौकशी पोलिस करणार आहेत. त्यांना पोलिस मुख्यालयात दोन दिवसांत हजर राहण्यासाठी समन्स पाठविले आहे. बुलेट गाडी खरेदी करण्यापूर्वी सहा महिने अगोदर बुकिंग करावे लागते. असे असताना पाठक यांनी मैनुद्दीनला तत्काळ गाडी दिली कशी, त्याच्याकडून वाढीव पैसे घेऊन दिली का, या दृष्टीनेही चौकशी केली जाणार आहे.

Web Title: Manidane demonstrated stolen demonstration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.