मंगलमयी गणेशपर्वाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:24 IST2021-09-11T04:24:18+5:302021-09-11T04:24:18+5:30
कोल्हापूर : एकदंत, वक्रतुंड गौरी तनयाय.. गजेशानाय भालचंद्राय.. विघ्नहर्ता.. विद्येचा अधिपती आणि भक्तांच्या मनावर अधिराज्य असलेल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या ...

मंगलमयी गणेशपर्वाला प्रारंभ
कोल्हापूर : एकदंत, वक्रतुंड गौरी तनयाय.. गजेशानाय भालचंद्राय.. विघ्नहर्ता.. विद्येचा अधिपती आणि भक्तांच्या मनावर अधिराज्य असलेल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या मंगलमयी पर्वाला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. महापूर, कोरोनासारख्या आपत्तींनी भेदरलेल्या जीवांच्या डोक्यावर शुभाशीर्वादाचा हात ठेवत आणि भक्तांच्या चेहऱ्यावर मनामनात आनंद, उत्साहाचे तेज निर्माण करत गणपती बाप्पा घराघरांत सजलेल्या आरासात विराजमान झाले.
वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रातील आबालवृद्धांचा लाडका गणपती बाप्पा घरी येणार म्हणून गेल्या आठ दिवसांपासून तयारी सुरू होती. एरवी धकाधकीचे, ताणतणावाचे आयुष्य जगताना वाटेवरच्या संघर्षाशी सकारात्मकतेने लढण्याचे बळ या गणेशोत्सवाने मिळते. गेल्या तीन वर्षांपासून कोल्हापूरकर महापूर, कोरोनासारख्या संकटांशी सामना करत आहे. या आपत्तींमुळे आलेली नकारात्मकता, आर्थिक कुचंबणा आणि निराशेला झटक्यात छुमंतर करत या उत्सवाने नागरिकांमध्ये अमाप उत्साह आणि आनंदाची उधळण केली. गेल्या आठ दहा दिवसांपासून सुरू असलेली तयारी गुरुवारी मध्यरात्री पूर्ण झाली. शुक्रवारी पहाटेपासूनच घराघरांत स्वच्छता, दारात सुरेख रांगोळी, खीर, मोदकांचा गोड सुवास दरवळत होता. कुणी तोरण लावत होते, कोण आरतीचे ताट लावत होते. आजीआजोबा, फुलं, दुर्वांची जुडी बनवत होते. फुलांच्या माळा, तोरणांनी घर सजले होते. सकाळी सात वाजल्यापासूनच घराघरांत गणेशमूर्तींचे आगमन होऊ लागले. बाप्पांचे आगमन झाल्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीने सणाचे उत्साही रंग अधिक गहिरे केले.
दारात गणेशमूर्ती आली की सुवासिनींनी देवाची नजर काढून औक्षण करून स्वागत केले. मोठ्या कष्टाने कितीतरी दिवस खर्ची घालून केलेल्या पाना-फुलांची, विद्युत रोषणाईची, मंदिरे, मखर अशा विविधांगी सजावटींमध्ये आणि आरासामध्ये देवीची मूर्ती विराजमान झाली. ऐश्वर्य संपन्न या देवाच्या प्रतिष्ठापनेने सजावटीचे सौंदर्य अधिकच खुलले. घराघरांत टाळ, घंटीच्या निनादात, धूपर-आरतीच्या प्रसन्न धुरात आरती झाली. गोड प्रसाद, खीर-मोदकसारख्या पंचपक्वान्न नैवेद्य दाखवण्यात आला. त्यानंतर कुटुंबीयांनी सहभोजनाचा आनंद घेतला.
--
मुलींनीच केले सारथ्य
देवाची मूर्ती पुरुषांनीच घ्यायची या पारंपरिक विचारसरणीला तिलांजली देत गेल्या काही वर्षांत मुलींनी गणेशमूर्ती नेण्याचे प्रमाण वाढले आहे. आता तर ही पद्धत इतकी रूढ झाली आहे की, पुरुषांच्या बरोबरीने मुलीच काय महिलांदेखील कुंभारगल्लीतून गणेशमूर्ती नेत होत्या. पुरोगामी कोल्हापूर या बिरुदावलीला साजेसा बदल स्वीकारत महिलांनी गणेशमूर्तींचे सारथ्य केले.
---
पारंपरिक वाद्यांचाच गजर
मोठ्या आवाजाच्या साऊंड सिस्टिमला फाटा देत गेल्या काही वर्षांपासून कोल्हापुरात गणेशोत्सवाला पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिले जात आहे. हीच परंपरा यंदाही कायम राहिली. शाहुपुरी कुंभार गल्ली, गंगावेश कुंभार गल्ली येथून ढोल पथकांच्या गजरात भाविक गणेशमूर्ती नेत होते. या वाद्यांनी वातावरणात उत्साह आला.
---
कोरोनाचे भय सरले...
गेल्यावर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोल्हापुरात कोरोना संसर्गाचा उच्चांक होता. सर्वाधिक रुग्ण या काळात होते, रुग्णालये भरून गेली होती. मृत्यूदरही जास्त होता. प्रशासन आणि नागरिक फार मोठ्या आपत्तीचा सामना करत होते. यंदा मात्र ऑगस्टमध्ये दुसरी लाट ओसरल्याने कोरोनाची भीती नागरिकांमध्ये नव्हती. त्यामुळे यंदाचा उत्सव भीतीच्या छायेखाली नाही, पण काळजी घेऊन साजरा करण्यात येत आहे.
--
पावसाची उघडीप
गेल्या पाच-सहा दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. पण शुक्रवारी पावसाने भाविकांच्या उत्साहाला साथ देत उसंत घेतली. सकाळी थोडा भुरभुर पाऊस होता. नंतर मात्र दिवसभर उघडीप दिल्याने भाविकांमध्ये समाधान होते, शिवाय पावसामुळे गैरसोय झाली नाही.
---