मानेवाडी, अवचितवाडीत एस.टी. बस पोहोचणार तरी केव्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:23 IST2020-12-22T04:23:55+5:302020-12-22T04:23:55+5:30

श्रीकांत ऱ्हायकर धामोड : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जवळपास सत्तर वर्षांचा कालखंड लोटला तरीदेखील तुळशी नदीकाठावरील मानेवाडी व अवचितवाडी ...

Manewadi, Avchitwadi ST. When will the bus arrive? | मानेवाडी, अवचितवाडीत एस.टी. बस पोहोचणार तरी केव्हा!

मानेवाडी, अवचितवाडीत एस.टी. बस पोहोचणार तरी केव्हा!

श्रीकांत ऱ्हायकर

धामोड : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जवळपास सत्तर वर्षांचा कालखंड लोटला तरीदेखील तुळशी नदीकाठावरील मानेवाडी व अवचितवाडी ही गावे एसटी बसपासून वंचित आहेत. येथील ग्रामस्थांना एसटीचा प्रवास लाभणार तरी केव्हा? की अनेक वर्षे वाटच पाहावी लागणार, असा प्रश्न येथील ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. एसटीअभावी येथील विद्यार्थ्यांची चांगलीच ससेहोलपट होत असून, केवळ शाळेसाठी सहा किलोमीटरची पायपीट करून या विद्यार्थ्यांना धामोड येथे चालत यावे लागत आहे.

महाराष्ट्र शासनाने गाव तिथे एस.टी. या ब्रीद वाक्य घेऊन महाराष्ट्रातील बहुतांशी वाड्या-वस्त्यापर्यंत एसटी सेवा पोहोचविण्याचे काम केले. पण, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात अद्यापही अशी काही खेडी एसटी बसपासून वंचित राहिलेली आहेत. दळणवळणाच्या सुविधा नसल्यामुळे येथील राहणीमान व त्याचबरोबर विकासकामांचा आलेख घसरताना पाहावयास मिळतो आहे. शालेय विद्यार्थ्यांना तर याचा नाहक त्रास होत असून, दळणवळणाच्या सुविधा नसल्याने या ठिकाणच्या मुलींचे शिक्षण थांबल्याचेही आकडेवारीवरून लक्षात येते.

तुळशी नदीकाठावरील ही दोन गावेही एसटी सेवेपासून अद्याप वंचित असल्याने या गावातील दहावी पास नंतरच्या मुलींना शालेय शिक्षण घेता येणे अवघड बनले आहे. इच्छा असूनही दळणवळणाच्या सुविधा नसल्याने या दोन गावांतील बारावी पास मुलींची आकडेवारी दोन अंकी संकेतही पाहावयास मिळत नाही. धामोड- म्हासुर्ली या मुख्य रस्त्यापासून साधारणत: दीड ते दोन किलोमीटर ही गावे आत असल्याने या मार्गावरून धावणारी एकमेव एस.टी. चुकल्यास मुलांना सहा किलोमीटरची पायपीट करून धामोड येथील शाळेत जावे लागत आहे.

एसटी सुरू करण्याबाबतची निवेदने येथील ग्रामस्थांकडून वारंवार देऊनदेखील या निवेदनात अधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखविली गेली आहे. त्यामुळे आता येथील ग्रामस्थांनी अखेरचा प्रयोग म्हणून एसटी आगार प्रमुखांच्या दारात ठिय्या मांडण्याचे ठरविले आहे. मुलींच्या शिक्षणाबाबत जागृतीची भूमिका बजावणाऱ्या सरकारने केवळ जाहिरातींच्या माध्यमातून आपली तत्परता न दाखविता अशा खेड्यापाड्यांमध्ये शिक्षणाबाबत मुलांची होणारी आबाळ थांबविण्यासाठी दळणवळणाच्या सुविधा अद्ययावत करणे गरजेचे आहे .

प्रतिक्रिया :

मानेवाडी ग्रामस्थांचा एस.टी. सेवेचा प्रश्न अकरा वेळा निवेदन देऊनदेखील अद्यापही सुटलेला नाही. आता आर-पारची लढाई म्हणून आगारप्रमुख राधानगरी यांच्या दारातच ठिय्या आंदोलन करणार आहोत.

- सचिन पाटील

Web Title: Manewadi, Avchitwadi ST. When will the bus arrive?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.