लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : व्यवसायातील नुकसान, कौटुंबिक अडचणी, कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेले जीवनमान, दीर्घ आजार आदी कारणांमुळे माणसांमध्ये नैराश्येची भावना वाढत आहे. गेल्या सव्वा दोन वर्षात जिल्ह्यात तब्बल १३३० जणांनी स्वत:चे जीवन संपवले. या आत्महत्येमध्ये सुमारे ९९७ पुरुषांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, आत्महत्यांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण तिप्पट आहे. सध्याच्या कोरोना परिस्थितीतही नैराश्येची भावना वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
स्पर्धात्मक युगात माणसाच्या कामाची गती प्रचंड वाढली. स्पर्धा व्यवसायातील असो अगर राजकारणातील, तेथेही माणसांच्या अपेक्षा उंचावत आहेत. त्या प्रमाणात अपेक्षा झटपट पूर्ण होत नसल्याने माणसात नैराश्येची भावना वाढीस लागत आहे. कमी वेळेत झटपट पैसा मिळवण्यासाठी स्वत:ची दगदग वाढवून घेऊन माणसाला व्याधीने ग्रासले आहे. त्यातून अंतिम क्षणी पदरात फक्त नैराश्यच पडत चालले आहे. त्यामुळे नैराश्येतून आत्महत्यासारखे टोकाचे निर्णय घेतले जात आहेत. आत्महत्या केल्यामुळे प्रश्न सुटत नाहीत तर ते अधिक जटील होतात. त्या व्यक्तीवर अवलंबून असणारे सारे कुटुंबच उघड्यावर पडते. त्यामुळे एखाद्या घटनेचा धक्का बसला अगर नुकसान झाले तर काही वेळ शांत राहण्याची सहनशीलता बाळगण्याची आवश्यकता आहे, पण आत्महत्या हा मार्ग नव्हे, हे आपण समजून घेतले पाहिजे.
सध्या महाराष्ट्रातही आत्महत्येचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. गेल्या सव्वा दोन वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल १३३० जणांनी आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांकडे झाली. यामध्ये पुरुषांचे प्रमाण मोठे आहे. यापूर्वी महिलेचा छळ झाल्याने महिलेच्या आत्महत्येच्या प्रमाणात मोठी वाढ असायची, त्याच्या नोंदीही पोलीस डायरीत भरायच्या; पण सध्या महिलाही सक्षम बनल्या. पुरुषांच्या खांद्याला -खांदा लावून काम करू लागल्या. त्यामुळे महिलांमध्ये आत्महत्येचे प्रमाण कमी होत आले. ही समाधानकारक बाब आहे.
नैराश्येचे वाढते प्रमाण
उद्योग-व्यवसायातील मंदी, आर्थिक नुकसान, प्रेम प्रकरणातील निराशा, कौटुंबिक अडचणी, प्रदीर्घ आजारपण, वाढती व्यसनाधीनता, कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेले जीवनमान आदी संकटांचा सामना करताना अनेकांचा जीव मेटाकुटीस आला आहे. त्यातून आत्महत्येचे विचार वाढत आहेत. विशेषत; पुरुषांमध्येच आत्महत्येचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
आत्महत्या प्रमाण
१) २०१९ वर्षे : ५७० (पुरुष-४४०, महिला-१३०)
२) २०२० वर्षे : ६१९ (पुरुष-४६५, महिला-१५४)
३) जानेवारी ते एप्रिल २०२१ : १४१ (पुरुष-९२, महिला-४९)