‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यास मारहाण

By Admin | Updated: August 31, 2014 00:28 IST2014-08-31T00:25:42+5:302014-08-31T00:28:58+5:30

गुन्हा दाखल : उत्तरेश्वर पेठेतील घटना

Mahavitaran's employee was beaten up | ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यास मारहाण

‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यास मारहाण

कोल्हापूर : उत्तरेश्वर पेठ येथील गणेश प्रासादिक तरुण मंडळाच्या शेजारी असलेल्या बदामाच्या झाडाची फांदी विद्युत वाहिन्यांना स्पर्श होत असल्याने ती ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांनी तोडली. याचा राग मनात धरून आज, शनिवार दुपारी दीडच्या सुमारास दोघा तरुणांनी दुधाळी येथील ‘महावितरण’च्या कार्यालयात घुसून वीज कर्मचारी संजय राजाराम राठोड (वय ३०, रा. सानेगुरुजी वसाहत) यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मारहाण करणाऱ्या दोघा तरुणांपैकी एकाचे नाव विजय चव्हाण असल्याचे समजले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चौका-चौकांत सार्वजनिक तरुण मंडळांनी मंडप उभे केले आहेत. विद्युत वाहिन्यांचा स्पर्श होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी महावितरणकडून गांभीर्याने दखल घेतली जात आहे. दुधाळी महावितरण शाखेच्या हद्दीमध्ये उत्तरेश्वर पेठ गणेश प्रासादिक तरुण मंडळाशेजारी बदामाचे झाड आहे. त्याच्या एका फांदीचा विद्युत वाहिन्यांना स्पर्श होत असल्याने सकाळी अकराच्या सुमारास कर्मचारी संजय राठोड, रमेश मुंडे, ऋषिपाल चौधरी, योगेश पाटील हे सर्वजण घटनास्थळी गेले. राठोड यांनी ती फांदी तोडून टाकली. त्यानंतर हे सर्वजण कार्यालयात गेले. दुपारी दीडच्या सुमारास सर्व कर्मचारी जेवण करीत असताना दोन तरुण कार्यालयात थेट घुसले. त्यांनी शिवीगाळ करीत राठोड यांना मारहाण केली. अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या समोरच ते मारहाण करीत होते. त्यानंतर तुला बघून घेतो, अशी धमकी देत ते निघून गेले. या मारहाणीच्या प्रकाराने ‘महावितरण’चे अधिकारी व कर्मचारी एकत्र आले. त्यांनी या घटनेचा निषेध करीत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Mahavitaran's employee was beaten up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.