देशात कुपोषणमुक्तीत महाराष्ट्र दुसरा
By Admin | Updated: July 16, 2015 23:53 IST2015-07-16T23:53:41+5:302015-07-16T23:53:41+5:30
वंदना कृष्णा यांची माहिती : राज्यात २२ टक्के कुपोषित मुले; २०१२ च्या सर्व्हेक्षणातील निष्कर्ष

देशात कुपोषणमुक्तीत महाराष्ट्र दुसरा
सावंतवाडी : भारतात कुपोषणमुक्तीत महाराष्ट्र लवकरच दुसऱ्या क्रमांकावर येणार आहे. सध्या महाराष्ट्राबरोबरच तमिळनाडू राज्यही दुसऱ्या क्रमाकांच्या स्पर्धेत आहे, तर पहिल्या क्रमांकावर केरळ राज्य आहे. हा सर्व्हे केंद्र शासनाच्या माध्यमातून झाला आहे. महाराष्ट्रात सध्या कुपोषित बालकांचे प्रमाण २२ टक्क्यावर आहे, अशी माहिती राजमाता जिजाऊ बाल आरोग्य पोषण अभियानाच्या महासंचालिका वंदना कृष्णा यांनी दिली. हा सर्व्हे अंगणवाडीच्या माध्यमातून २०१२ मध्ये झाल्याचेही त्यांनी सांगितले.श्रीमती कृष्णा या दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून त्यांनी सावंतवाडीत कुषोषणमुक्तीचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, गटविकास अधिकारी शरद महाजन, सहायक गटविकास अधिकारी मोहन भोई, आदी उपस्थित होते.
यावेळी वंदना कृष्णा म्हणाल्या, महाराष्ट्रात कुपोषणमुक्तीचे प्रमाण आता वाढत असून नंदुरबार, मेळघाट, पालघर व नाशिक या चार जिल्ह्यांमध्ये प्रमाण अधिक आहे. यामुळेच महाराष्ट्र भारतात कुपोषणमुक्तीत कमी पडत आहे. मात्र, आता नव्याने या चार जिल्ह्यांसाठी कार्यक्रम राबवण्यात येत आहे. मोठमोठ्या कंपन्या तसेच लोकप्रतिनिधी, संस्था या कुपोषित गावांना दत्तक घेऊ लागले आहेत. अशा कंपन्या आणखी मोठ्या प्रमाणात पुढे आल्या, तर हे कुपोषण लवकरच कमी होईल, अशी आम्हाला आशा आहे.
केरळ राज्य कुपोषण मुक्तीत देशात १ नंबरवर आहे, तर लहान राज्यांचा विचार केला, तर गोवाही देशात पुढे आहे. मात्र, मोठ्या राज्यांची तुलना केली तर तमिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमध्ये स्पर्धा सुरू आहेत, (पान ८ वर)
सांगली नंबर १, तर सिंधुदुर्ग सातवा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुपोषित मुले नसून, वजन कमी असलेली मुले ६९९ आहेत. मात्र, हा आकडा कमी होईल, अशी आशा वंदना कृष्णा यांनी व्यक्त केली. मी दोन दिवस सर्व्हे केला असून ही आकडेवारी कमी व्हावी यासाठी कसे प्रयत्न केले जावेत, याचे मार्गदर्शन केले असून, सिंधुदुर्गही राज्यात पहिल्या क्रमाकांत बसेल. सध्या सांगली, कोल्हापूर, सातारा हे जिल्हे पुढे असल्याचेही त्यांनी सांगितले. ही आकडेवारी आम्ही सीएनएस या संस्थेने केलेल्या सर्व्हेतून उघड केली असून ही संस्था पारदर्शक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कुपोषण शब्द मुक्तीसाठी राज्य शासन प्रयत्न करीत असून आमचे मिशन या मुक्तीसाठीच प्रयत्न करेल. नंदुरबार, मेळघाट, पालघर, नाशिक या जिल्ह्यांत कुपोषणाचे प्रमाण अधिक असल्याने आम्ही मागे पडत आहोत.
- वंदना कृष्णा, महासंचालिका, राजमाता जिजाऊ बाल आरोग्य पोषण अभियान