‘महारेरा’कडून जिल्ह्यातील ३४ बांधकाम प्रकल्पांवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:25 IST2021-07-31T04:25:03+5:302021-07-31T04:25:03+5:30

कोल्हापूर : वेळेत प्रकल्प पूर्ण केले नसल्याने अथवा त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर केले नसल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील ३४ बांधकाम प्रकल्पांना ...

Maharashtra bans 34 construction projects in the district | ‘महारेरा’कडून जिल्ह्यातील ३४ बांधकाम प्रकल्पांवर बंदी

‘महारेरा’कडून जिल्ह्यातील ३४ बांधकाम प्रकल्पांवर बंदी

कोल्हापूर : वेळेत प्रकल्प पूर्ण केले नसल्याने अथवा त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर केले नसल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील ३४ बांधकाम प्रकल्पांना त्यांच्या सदनिका विक्री करण्यास महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने (महारेरा) बंदी घातली आहे. या प्रकल्पांमधील फ्लॅट, रो-हाऊस आणि बंगलो यांच्या विक्रीबाबतच्या नोंदणीला मनाई केली आहे.

बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्या गृहप्रकल्पांची ‘महारेरा’ अंतर्गत नोंदणी करणे बंधनकारक आहे. प्रकल्पाची नोंदणी करताना त्यातील बांधकाम पूर्ण करण्याचा कालावधी आणि ग्राहकांना सदनिकेचा ताबा कोणत्या महिन्यामध्ये दिला जाणार, याची माहिती देणे आवश्यक आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील गेल्या तीन वर्षांत एकूण ३४ बांधकाम प्रकल्पांनी नोंदणी करताना दिलेल्या माहितीची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे ‘महारेरा’ने या प्रकल्पांमधील फ्लॅट, रो-हाऊस, बंगलो यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. त्यामध्ये करवीर तालुक्यातील सर्वाधिक २६, हातकणंगले, गडहिंग्लज तालुक्यातील प्रत्येकी दोन, तर कागल आणि गगनबावडा तालुक्यातील प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे.

चौकट

प्रकल्प पूर्ण झाल्याचे कळविले नसल्याने अडचण

‘महारेरा’कडे गृहप्रकल्पाची नोंद करताना हा प्रकल्प कधी पूर्ण करणार, याची माहिती दिली जाते. प्रकल्प पूर्ण केल्यानंतर फॉर्म नंबर फोर (आर्किटेक्ट कम्प्लिशन सर्टिफिकेट) हे प्रमाणपत्र महारेराच्या संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे. ते गेल्या तीन वर्षांत या गृहप्रकल्पांनी केलेले नाही. त्यामुळे महारेराने या प्रकल्पांना सदनिका विक्रीला बंदी घातली असल्याचे क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी शुक्रवारी सांगितले. या बंदी घातलेल्या प्रकल्पांपैकी ९५ टक्के प्रकल्प पूर्ण झाले आहेत. त्यातील बहुतांश सदनिकांची पूर्वीच विक्री झाली आहे. क्रीडाई कोल्हापूरने या बांधकाम व्यावसायिक सभासदांना हे फॉर्म नंबर फोर लवकर अपलोड करण्याचे आवाहन केले आहे. ते झाल्यानंतर या बंदीतून हे प्रकल्प बाहेर पडतील. तोपर्यंत या बांधकाम व्यावसायिकांना सदनिकांची विक्री करता येणार नसल्याचे बेडेकर यांनी सांगितले.

पॉईंटर

बंदी घातलेल्या वर्षनिहाय प्रकल्पांची संख्या

२०१७ : ५

२०१८ : १३

२०१९ : १६

Web Title: Maharashtra bans 34 construction projects in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.