महाडिकांनी घेतली खासदारकीची शपथ
By Admin | Updated: June 6, 2014 01:40 IST2014-06-06T01:25:41+5:302014-06-06T01:40:35+5:30
मराठीतून शपथ : कोल्हापूरला देशात अग्रेसर बनविण्यास कटिबद्ध

महाडिकांनी घेतली खासदारकीची शपथ
कोल्हापूर : नूतन खासदार धनंजय महाडिक यांनी आज, गुरुवारी दुपारी संसदेत पीठासन अधिकारी पी. ए. संगमा यांच्या उपस्थितीत खासदार म्हणून मराठी भाषेमध्ये शपथ घेतली.
यावेळी महाडिक यांनी ‘मी धनंजय महाडिक र्ईश्वराला साक्ष ठेवून शपथ घेतो की, संविधानाने मला दिलेले हक्क आणि कर्तव्याचे मी पालन करीन आणि देशाची अखंडता कायम ठेवण्यास प्रयत्नशील राहीन’, अशा शब्दांत खासदारकीची शपथ घेतली. शपथ घेण्यापूर्वी महाडिक यांनी आपले पिता (कै.) भीमराव महाडिक यांना अभिवादन केले.
कोल्हापूरच्या नूतन खासदारांचा शपथविधी पाहण्यासाठी नागरिकांनी टी.व्ही.समोर एकच गर्दी केली होती. महाडिक हे शपथ घेण्यास उभे राहताच नागरिकांनी एकच जल्लोष करीत आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांनी जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या वचनानुसार कोल्हापूरला राज्यात आणि देशात अग्रेसर बनविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे सांगितले. तसेच आपल्या विजयासाठी मदत करणार्या सर्वच घटकांचे आभार खासदार धनंजय महाडिक यांनी मानले.