महाडिक-फडणवीस भेटीची जिल्हाभर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 21:14 IST2019-05-29T21:05:52+5:302019-05-29T21:14:03+5:30
राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने बुधवारी या भेटीची जिल्हाभर चर्चा सुरू होती. महाडिक समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी विविध प्रतिक्रिया जिल्हाभर उमटल्याचे चित्र पाहावयास मिळाले. दरम्यान, पुढील महिन्यात होणाऱ्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान याबाबतच्या हालचाली आणखी वेगावण्याची शक्यता आहे.

महाडिक-फडणवीस भेटीची जिल्हाभर चर्चा
कोल्हापूर : राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने बुधवारी या भेटीची जिल्हाभर चर्चा सुरू होती. महाडिक समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी विविध प्रतिक्रिया जिल्हाभर उमटल्याचे चित्र पाहावयास मिळाले. दरम्यान, पुढील महिन्यात होणाऱ्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान याबाबतच्या हालचाली आणखी वेगावण्याची शक्यता आहे.
गेले तीन दिवस महाडिक मुंबईत आहेत. मंगळवारी सायंकाळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनीच महाडिक यांना मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटण्याची सूचना केली आणि ‘वर्षा’ निवासस्थानीही तशी कल्पना दिली. यानंतर धनंजय महाडिक आणि फडणवीस यांची भेट झाली.
या भेटीची बुधवारी दिवसभर जिल्ह्यात चर्चा सुरू होती. महाडिक हे त्यांच्या सोईचे राजकारण करतात, हे पुन्हा एकदा सिद्ध होतेय, असा सूर राष्ट्रवादीमधीलच त्यांच्या विरोधी नेते, कार्यकर्त्यांचा असून, याउलट महाडिक यांना मानणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी ‘एकदा भाजपमध्ये प्रवेश कराच’ अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
मंगळवारी राष्ट्रवादीच्या बैठकीत शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी महाडिक यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली, तर दुसरीकडे राष्ट्रवादीवाल्यांनीच पराभवाला हातभार लावल्याने तिथे राहून काय उपयोग? असा सवाल महाडिक समर्थक करत आहेत.