मद्रास बटालियन अंतिम फेरीत
By Admin | Updated: March 9, 2017 00:52 IST2017-03-09T00:52:57+5:302017-03-09T00:52:57+5:30
इंटरबटालियन फुटबॉल स्पर्धा

मद्रास बटालियन अंतिम फेरीत
कोल्हापूर : सदर्न कमांड इंटर बटालियन फुटबॉल स्पर्धेत १२२ इन्फंट्री बटालियन (टीए) संघाने १५४ इन्फंट्री बटालियन (टीए) संघावर ९-१ अशी दणदणीत मात करत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
शाहू स्टेडियम येथे बुधवारी १२२ इन्फंट्री बटालियन (टीए)मद्रास विरुद्ध १५४ इन्फंट्री बटालियन (टीए) बिहार संघ यांच्यात उपांत्य फेरीतील पहिला सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासून मद्रास संघाचे वर्चस्व राहिले. मद्रासकडून चिकोने ७ व्या मिनिटाला गोल करत संघाचे खाते उघडले. त्यानंतर अब्दुल रहिमानने २३ व २६ व्या मिनिटास गोल करत सामना ३-० अशी भक्कम स्थितीत आणला. ३१ व्या मिनिटाला बिहार संघाकडून राजलाल याने गोल करत सामन्यात बरोबरी साधली. पूर्वार्धात सामना ३-१ अशा स्थितीत राहिला. उत्तरार्धात सामन्यात बरोबरी साधण्याच्या इराद्याने बिहार संघ मैदानात दाखल झाला. बिहारकडून मेनव्हॉ, एम्युन्यूल, ब्राईन यांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. मात्र, सजग मद्रास संघाच्या बचावफळीने त्यांचे गोल करण्याचे इरादे निष्फळ ठरविले. ५५ व्या मिनिटास मद्रास संघाकडून परमेश के.व्ही. याने गोल नोंदवत ही आघाडी ४-१ अशी केली. त्यात ५८ व्या मिनिटास श्रीजीतने गोल करत ५-१ अशी आघाडी आणखी भक्कम केली. पुन्हा परमेश के.व्ही.ने ६५ व्या मिनिटास गोल करत ६-१ अशी गोलसंख्या नोंदविली. उत्तरोत्तर मद्रास संघाचा खेळ बहरत गेला. ७५ व्या मिनिटास सुमेंशने मैदानी गोल करत त्यात आणखी भर घालत आघाडी ७-१ अशी केली. शेवटच्या काही क्षणांत सामन्यावर मद्रास संघाचेच पूर्ण वर्चस्व राहिले. त्यांच्याकडून शैजूने ८०, तर परमेश के.व्ही.ने वैयक्तिक तिसरा गोल नोंदवत ९-१ अशी भक्कम आघाडी केली. संपूर्ण वेळेत सामना याच गोलसंख्येवर राहिल्याने मद्रास संघाने विजयाबरोबर अंतिम फेरीत स्थान मिळविले.