साहसी खेळ प्रकारात ‘मॅक’ सल्लागाराची भूमिका बजावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:26 IST2021-07-30T04:26:33+5:302021-07-30T04:26:33+5:30

कोल्हापूर : साहसी खेळात सुरक्षेचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे अशा खेळाच्या सराव किंवा मोहिमेदरम्यान अपघात होतात. हे टाळण्यासाठी ...

‘Mac’ will play the role of advisor in the adventure sports genre | साहसी खेळ प्रकारात ‘मॅक’ सल्लागाराची भूमिका बजावणार

साहसी खेळ प्रकारात ‘मॅक’ सल्लागाराची भूमिका बजावणार

कोल्हापूर : साहसी खेळात सुरक्षेचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे अशा खेळाच्या सराव किंवा मोहिमेदरम्यान अपघात होतात. हे टाळण्यासाठी राज्य शासनाने या खेळासाठी नवा अध्यादेश तयार केला आहे. त्याकरिता महाराष्ट्र ॲडव्हेंचर कौन्सिल (मॅक) सल्लागाराची भूमिका बजावेल, अशी माहिती मॅकचे अध्यक्ष वसंत लिमये यांनी गुरुवारी दिली.

गिर्यारोहण या साहसी खेळ प्रकार मोहिमेदरम्यान सुरक्षा नियमावली न पाळल्याने अपघाताला सामोरे जावे लागते. अशा घटनाच घडू नयेत. याकरिता मॅकने २००६ साली एका मोहिमेदरम्यान झालेल्या अपघाताबद्दल न्यायालयात धाव घेतली. यात अशा मोहिमा आयोजित करणाऱ्यांना नियमावली असावी, अशी मागणी केली. त्यावर एका संस्थेने हरकत घेतली. त्यानंतर २०१३ साली मॅकने पुनर्याचिका केली. यादरम्यान २०१४ साली राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालय व त्यानंतर २०१८ ला क्रीडा विभागाने नियमावली हवी म्हणून अध्यादेशासाठी प्रयत्न केले. त्यास २०२१ मध्ये यश आले. अखेर हा अध्यादेश तयार झाला असून त्याची अंमलबजावणी येत्या काळात होणार आहे. त्यानुसार राज्य शासनाने राज्यातील सर्व गिर्यारोहण व साहसी संस्थांकरिता सल्लागार व समन्वय म्हणून मॅकला मंजुरी दिली आहे. या संस्थांची संलग्नता बंधनकारक नाही. ज्या संस्था असे मार्गदर्शन न घेता मोहिमा आखतील. त्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे. मोहिमेदरम्यान सुरक्षा नियम न पाळल्यास अथवा दुर्दैवी घटना घडल्यास त्यांना कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून मॅकने प्राथमिक स्तरावर संस्था संलग्नता नोंदणी करण्यासाठी जागृती सुरू केली आहे. त्यानुसार राज्यातील सहा विभागाअंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे. त्याद्वारे अत्याधुनिक प्रशिक्षण व जनजागृती केली जाणार आहे. या खेळातील नवा अध्यादेशाचा सर्व मसुदा तयार असून त्यास राज्य मंत्री मंडळात मंजुरीही दिली आहे. यासंबंधी कोल्हापुरातील विविध गिर्यारोहण संस्थांची बैठक घेण्यात आली. त्यात या नव्या अध्यादेशाची माहिती लिमये यांनी दिली.

यावेळी मॅकचे संचालक शिरीष सहस्रबुद्धे, ऋषिकेश केसकर, कोल्हापूर स्पोर्ट्स क्लाइंबिंग असोसिएशनचे अध्यक्ष परेश चव्हाण, कोल्हापूर जिल्हा माँटेनियरिंग ॲन्ड अलाइड स्पोट्र्स असोसिएशनचे विनोद कांबोज, प्रमोद पाटील, पोलीस निरीक्षक संजय जाधव, पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले, ॲड. केदार मुनीश्वर, सूरज डोली आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: ‘Mac’ will play the role of advisor in the adventure sports genre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.