फुलेवाडी : फुलेवाडी रिंग रोड परिसरातील अनेक कॉलन्या व नगरांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे, तर काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. येथील नागरिकांनी सातत्याने पाठपुरवठा करूनही महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. रिंग रोडवरील महादेव नगरी, पांडुरंग नगर, राज्याभिषेक कॉलनी, शिवशक्ती कॉलनी, सदगुरू कॉलनी, गजानन कॉलनी, संतसेना नगर या ठिकाणी गेल्या दोन महिन्यांपासून अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे, तर काही ठिकाणी पाणी येत नसल्याचे चित्र आहे.
टँकरने पाणी देण्याचा प्रयत्न..
ज्या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होत नाही त्या ठिकाणी एकदिवस आड टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, मुख्य पाईपला जोड देऊन संबंधित कॉलन्यांना सुरळीतपणे पाणीपुरवठा करता येऊ शकतो. पण, अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. महापालिका पाणीपुरवठा विभागाने याबाबत उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.
कोट : सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी गेले दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अधिकारी योग्य ती उपाययोजना करीत नाहीत. विजयसिंह देसाई, बोंद्रेनगर
कोट : आमच्या कॉलनीत गेले दोन महिन्यांपासून पाणी येत नाही. टँकरने एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. पाण्यासाठी इतर कामे सोडून टँकरची वाट बघत बसावे लागते. शिल्पा सरदार पाटील, राज्याभिषेक कॉलनी.
फोटो : २४ फुलेवाडी पाणीपुरवठा
ओळ : राज्याभिषेक कॉलनी येथे सुरू असलेला टँकरने पाणीपुरवठा. (छाया : सागर चरापले)