कमी व्यवहार होणारी ‘एटीएम’ बंद : दररोज १00 व्यवहारांचे बंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:24 IST2018-03-24T00:24:33+5:302018-03-24T00:24:33+5:30
कसबा बावडा : ज्या ‘एटीएम’ सेंटरमधून दर दिवशी शंभर ट्रान्झॅक्शन (व्यवहार) होणार नाहीत, असे एटीएम बंद करण्याच्या हालचाली कोल्हापुरातील काही राष्ट्रीयीकृत बँकांनी आता सुरू केल्या आहेत.

कमी व्यवहार होणारी ‘एटीएम’ बंद : दररोज १00 व्यवहारांचे बंधन
रमेश पाटील।
कसबा बावडा : ज्या ‘एटीएम’ सेंटरमधून दर दिवशी शंभर ट्रान्झॅक्शन (व्यवहार) होणार नाहीत, असे एटीएम बंद करण्याच्या हालचाली कोल्हापुरातील काही राष्ट्रीयीकृत बँकांनी आता सुरू केल्या आहेत. येत्या काही महिन्यांत जिल्ह्यात सध्या असलेल्या एटीएमच्या संख्येत दहा टक्क्यांनी घट करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या दुर्गम भागातील एटीएम बंद होऊ लागली आहेत.
कॅशलेस व्यवहार वाढावेत, यासाठी सरकारने एटीएम संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या एटीएमवर जास्त व्यवहार आहेत अशीच एटीएम बँकांना काहीसा दिलासा देऊ शकतात. परंतु, ज्या एटीएमवर व्यवहार कमी आहेत, अशी एटीएम बँकेला तोट्यात नेतात. सध्या एटीएमचा खर्च परवडत नसल्याची बँकांची तक्रार आहे. एटीएम सेंटरचे भाडे, सुरक्षारक्षकाचा पगार, एटीएम आॅपरेटरचा खर्च, वीज भाडे, देखभाल-दुरुस्ती खर्च आदीमुळे एटीएमचा खर्च वाढत चालला आहे. त्यामुळे बँका नवीन एटीएम सुरू करण्याच्या मन:स्थितीत नाहीत. कमी व्यवहार असलेले एटीएम बंद करून बँकेचा तोटा कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
सध्या कॅशलेस व्यवहार वाढले आहेत. अनेकजण आता आॅनलाईन व्यवहार करीत आहेत. अशावेळी एटीएमचा वापर साहजिकच कमी होत आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, खासगी बँकांनी दर दिवशी शंभर ट्रॉन्झेक्शन होत नसलेल्या एटीएमची पाहणी करून ती टप्प्याटप्याने बंद करण्याचे काम हाती घेतले आहे.
कोल्हापूर शहरात सुमारे २७५ एटीएम सेंटर आहेत. शहर आणि ग्रामीण भागात म्हणजेच संपूर्ण जिल्ह्यात मिळून ४८५ एटीएम आहेत. यापैकी दहा टक्के म्हणजेच ४८ ते ५० एटीएम सेंटर बंद होणार आहेत. सध्या बंद करण्यात आलेली एटीएम मशीन एखाद्या गर्दीच्या ठिकाणी असलेल्या एटीएम सेंटरमध्ये जादा बसवली जात आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील सध्या दहा टक्के एटीएम जरी बंद झाली तरी नजीकच्या काही महिन्यांत या बंद एटीएमच्या संख्येत आणखी वाढ होणार असल्याचे बँक वर्तुळातून सांगण्यात आले. शहरातील एटीएम मात्र, बंद होण्याची शक्यता कमी आहे. कारण शहरातील बहुतेक एटीएमवर योग्य त्या प्रमाणात व्यवहार होताना दिसत आहेत. असे जरी असले तरी पूर्वीसारखे मोठ्या थाटामाटात एटीएम सेंटरचे उद्घाटन आता राष्ट्रीयीकृत बँकांचे दिसण्याची शक्यता कमी आहे.
एटीएम सेंटरचा वाढता खर्च बँकांना परवडत नाही म्हणून जरी एटीएम बंद होत असली तरी लोकांनी कॅशलेस व्यवहार करावेत, यासाठीच बँकांनी हा निर्णय घेतला आहे, अशी चर्चा आहे.