स्वादिष्ट भरपूर; ‘अख्खा मसूर’
By Admin | Updated: August 17, 2014 23:34 IST2014-08-17T23:14:29+5:302014-08-17T23:34:14+5:30
आठवड्याला २० टन मसूरची गरज : मधूमेह रुग्णांना लाभदायक

स्वादिष्ट भरपूर; ‘अख्खा मसूर’
सचिन भोसले- ल्हापूर --पचायला हलका अन् आरोग्यदायी म्हणून ‘मसूर’ला मोठे महत्त्व आहे. ‘मसूर’ लाल, पिवळा, नारिंगी, हिरवा आणि तपकिरी या रंगांतही उपलब्ध आहे. कोल्हापूरच्या बाजारपेठेत इंदौरसह कोल्हापूरच्या आसपासही उत्पादित होणारा मसूरही विक्रीसाठी येतो. साधारणपणे जिल्ह्याला आठवड्याला २० टन इतका मसूर लागतो; तर कोल्हापूरची खासियत म्हणून ‘अख्खा मसूर’ हा पदार्थही सर्व देशभर प्रसिद्ध आहे. अशा या आरोग्यदायी ‘मसूर’चे महत्त्व ‘लोकमतसंगे’ जाणून घेऊ.
मसूरची लागवड सुमारे ९५०० वर्षांपूर्वीपासून केली जाते. पश्चिम आशियाई भागात मसूर व भात एकत्रित करून शिजवून खाल्ला जातो. त्याला ‘मुजदारा’ असे म्हणतात. भारत आणि शेजारील पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, म्यानमार, आदी देशांमध्ये मसूरची खिचडीही केली जाते. मसूरला इजिप्तमध्येही राष्ट्रीय पदार्थ म्हणून मान्यता आहे. युरोप, उत्तर व दक्षिण अमेरिकेमध्ये मसूर हा एक स्वस्त व परवडणारा पदार्थ म्हणून सूप आणि विविध मांसाहारी पदार्थांबरोबर खाल्ला जातो.
भारतात मसूरडाळीची आमटी, मसूर सुका, अख्खा मसूर हे पदार्थ चवीने खाल्ले जातात. याचबरोबर मसूर भिजत ठेवून, त्याला मोड आणून त्याची पौष्टिकता वाढवूनही खाल्ला जातो. भारतात मसूरचा ‘अख्खा मसूर’ हा पदार्थ लोकप्रिय झाला आहे. विशेष म्हणजे या पदार्थासाठी इम्पोर्टेड मसूर
लागतो.
सुक्या मेवानंतर मसूरला महत्त्व
मसुरामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्याने भारतासह पश्चिम आशियाई देशांत याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जितकी ताकद सुक्या मेव्यामध्ये असते, तितकीच ताकद मसुरामध्येही असते. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर मसूरचे मोड आलेले पदार्थ अशक्त झालेल्या व्यक्तीला खाण्याचा सल्ला देतात.
मसूरमध्ये अधिक प्रमाणात स्टार्च असल्याने मधुमेही रुग्णांना तो अधिक लाभदायक आहे. मसूरचे उत्पादन हे कॅनडा, भारत, तर्की, आॅस्ट्रेलिया येथे घेतले जाते. एकूण उत्पादनापैकी भारत एक चतुर्थांश उत्पादन करतो.
कोरी आणि पॉलिश
कोल्हापूरच्या बाजारात कोरी अर्थात जवारी मसुराला मोठी मागणी आहे. याचबरोबर पॉलिश केलेला मसूरही बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहे. झाशी, उत्तरप्रदेश येथील मसुराबरोबरही स्थानिक शेतकऱ्यांकडूनही मसुराचे उत्पादनही घेतले जाते. मसूर, तांदूळ, गहू व इतर डाळीप्रमाणे मोठ्या प्रमाणात खपत नसल्याने आवकही आठवड्याला वीस टन इतकी आहे. कोल्हापूरसह कोकणातही येथून मसूर मागणीप्रमाणे पाठविला जातो.
- पीयूष सामाणी, कडधान्य व्यापारी, कोल्हापूर
मसूरमध्ये बेळगावी व नाशिक हे दोन विशेष प्रकार आहेत. दोन्ही मिक्स करून वापरतो. अख्खा मसूर हा गोड, चटकदार आणि जिभेवर चव रेंगाळणारा पदार्थ असून, तो पूर्णत: नैसर्गिकरीत्या बनविला जातो. त्यामुळे इकडे वळलेला ग्राहक कायम राहतो. गेल्या आठ वर्षांपूर्वी कोल्हापुरातील ठराविक वर्गालाच माहीत असणारा हा पदार्थ सर्वांच्या आवडीचा बनलेला आहे. अख्खा मसूर खाल्ल्यानंतर परिपूर्ण जेवण झाल्याची प्रतिक्रिया ग्राहकांतून नेहमी व्यक्त होते. अन्य खाद्यपदार्थांपेक्षा रुचकर व योग्य किमत हेही वैशिष्ट्य आहे. कोल्हापुरात आम्ही प्रथमच अख्खा मसूर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविला. - इकबाल शेख, हॉटेल व्यावसायिक, कोल्हापूर.