राम मगदूम - गडहिंग्लज -कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर राहणाऱ्या जनतेची दोन्ही राज्यांच्या एस.टी. खात्याकडून ‘लूट’ सुरू आहे. साध्या गाड्यांना एका टप्प्यासाठी महाराष्ट्रात ६ रूपये, तर कर्नाटकात ९ रूपये तिकिट असताना गडहिंग्लज-संकेश्वर मार्गावर एका टप्प्यासाठी तब्बल १३ रूपये तिकिटाची आकारणी केली जात आहे. त्यामुळे सीमाभागातील प्रवासी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.६ किलोमीटर अंतरासाठी एक टप्पा धरला जातो. मात्र, गडहिंग्लज- संकेश्वर मार्गावरील कर्नाटक हद्दीतील संकेश्वर ते हिटणी नाका हे अंतर अवघे ३ किलोमीटर असताना त्यासाठीही एक टप्पाच धरला जातो. संकेश्वर ते हिटणी नाका तिकिटदर ७ रूपये आकारले जाते. गडहिंग्लज संकेश्वर मार्गावरील मुत्नाळ ते संकेश्वर अंतर ५ किलोमीटर, निलजी ते संकेश्वर ६ किलोमीटर, तर हेब्बाळ ते संकेश्वर अंतर ७ किलोमीटर आहे. हेब्बाळ, निलजी व मुत्नाळच्या प्रवाशांना संकेश्वरला जाण्यासाठी १३ रूपये भाडे आहे. कर्नाटकहद्दीमुळे या तीन गावांना ५ ते ७ किलोमीटरसाठी ६ रूपयांऐवजी १३ रूपये मोजावे लागत आहेत. याच मार्गावरील मुत्नाळ ते गडहिंग्लज १० कि.मी., निलजी ते गडहिंग्लज ९ कि. मी., तर हेब्बाळ ते गडहिंग्लज अंतर ८ किलोमीटर आहे. मुत्नाळ, निलजी व हेब्बाळच्या प्रवाशांना गडहिंग्लजला येण्यासाठी ९ रूपये भाडे आहे. ७ किलोमीटर अंतराच्या हेब्बाळ ते संकेश्वर प्रवासासाठी १३ रूपये मोजावे लागतात. त्याउलट १० किलोमीटर अंतराच्या मुत्नाळ ते गडहिंग्लज प्रवासासाठी ९ रूपये प्रवासभाडे आहे. मुत्नाळ ते गडहिंग्लज हा भाग महाराष्ट्रात असल्यामुळे कर्नाटकच्या तुलनेत अंतर जास्त असूनही तिकिटदर ४ रूपयांनी कमी आहे. सीमा बाजूला ठेवून टप्प्यांप्रमाणे तिकिटाची आकारणी करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.सीमेवर असूनही एकच टप्पाकोगनोळी ते कागल आणि संकेश्वर ते नांगनूर हे अंतरही कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर असतानाही याठिकाणी मात्र एका टप्प्याचेच बसभाडे आकारले जाते.
सीमाभागातील प्रवाशांची एस.टी.कडून लूट
By admin | Updated: December 5, 2014 23:38 IST