एकटीमुळे तिच्या आयुष्यात आले ‘आनंद’पर्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:22 IST2021-03-24T04:22:45+5:302021-03-24T04:22:45+5:30
कोल्हापूर : ती कर्नाटकातील. कौटुंबिक कलहामुळे तिने घर सोडले, विमनस्क अवस्थेत फिरत फिरत ती कोल्हापुरात आली. धो धो कोसळणाऱ्या ...

एकटीमुळे तिच्या आयुष्यात आले ‘आनंद’पर्व
कोल्हापूर : ती कर्नाटकातील. कौटुंबिक कलहामुळे तिने घर सोडले, विमनस्क अवस्थेत फिरत फिरत ती कोल्हापुरात आली. धो धो कोसळणाऱ्या पावसात दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ बसलेली ही तरणी ताठ पोर पाहून एकटी संस्थेने धाव घेत तिला कवेत घेतले. तिला आधार दिला. पुढे हीच सर्वांचा आधार बनली. तीन वर्षे अवनि संस्थेतच ती अन्य बेघर, निराधारांची माय झाली. आज अवघ्या पंचविशीतील ही तरुणी विवाहवेदीवर पाय ठेवून आयुष्याच्या नव्या आनंदपर्वाची सुरुवात करत आहे.
कोल्हापूर महानगरपालिका व अवनी आणि एकटी संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या अवनी बालगृह नवीन इमारत जैताळ फाटा गारगोटीरोड या बेघर निवारात केंद्रात आज बुधवारी सनई चौघडे वाजणार आहेत. दुपारी १२च्या मुहूर्तावर या तरुणीचा सत्यशोधक पद्धतीने विवाह होत आहे. या अनोख्या विवाहात सहभागी होण्यासाठी अवनी, एकटीसह बेघर निवारा केंद्रातील महिला, अन्य कर्मचाऱ्यांची लगीनघाई सुरू आहे.
ही मूळची कर्नाटकातील मुलगी तीन वर्षांपूर्वी कोल्हापुरात आली. पावसात भिजत बसलेली पाहून कुणीतरी एकटी संस्थेला कळवले. अध्यक्ष अनुराधा भोसले यांनी तिला आधार दिला. दु:खाचा डोंगर कोसळलेल्या या तरुणीची अवस्था खूपच वाईट होती. तशाच अवस्थेत तिला मध्यवर्ती बसस्थानकाजवळील बेघर निवारा केंद्रात दाखल केले गेले. कौटुंबिक कलहामुळे पार कोलमडून गेलेल्या त्या पोरीला या केंद्राने खूप आधार दिला. तिच्यावर औषधोपचार केले. ती आजारी असताना सारे केंद्र तिची काळजी घ्यायचे आज मात्र ती साऱ्या केंद्राची आधार बनली आहे. वय अवघे २५ वर्षे, असे एकटे आयुष्य कसे जाणार म्हणून तिला लग्नाबद्दल विचारले. शाहूवाडी तालुक्यातील विचाराने समृद्ध असलेल्या कुटुंबातून एक स्थळ तिला चालून आले. खऱ्या अर्थाने तिच्या जीवनात आनंद आला. मुलगा आणि कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली असल्याने आता खऱ्या अर्थाने तिला तिचे घर, कुटुंब सर्व काही हक्काचे मिळाले आहे.
या मुलीचे आयुष्य पुन्हा उभे राहत आहे, तिला हक्काचे घर व मायेचे कुटुंब मिळत आहे हीच आमच्यासाठी आनंदाची बाब आहे.
अनुराधा भोसले
अवनी संस्था, कोल्हापूर