संदीप आडनाईक कोल्हापूर : ती आली… तिने पाहिले… आणि आम्हाला जिंकून गेली! सह्याद्रीच्या दाट जंगलात शुक्रवारी पहाटे झालेल्या ‘चंदा’ वाघिणीच्या दर्शनाने ‘लोकमत’च्या टीमसाठी तो क्षण आयुष्यभराचा ठेवा ठरला. भेदक डोळे, रुबाबदार पण शांत चाल आणि क्षणभरासाठी तिने टाकलेला कटाक्ष यांमुळे सर्वांची रात्रभराची प्रतीक्षा अक्षरशः सार्थ ठरली. सह्याद्रीच्या कुशीतील हा रोमांचक अनुभव, रात्रभरच्या प्रतीक्षेला मिळालेला परमोच्च आनंद, ‘लोकमत’च्या टीमसाठी शुक्रवारी खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरला.वाघाचे दर्शन हा दुर्मीळ योग मानला जातो. सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात तीन वाघिणी दाखल झाल्यामुळे हा योग साध्य झाला. काटेकोर नियमांचे पालन करत ‘लोकमत’ची टीम दोन दिवस चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात मुक्कामी होती. बहुतेक वन्यजिवांच्या हालचाली सायंकाळनंतर वाढतात; त्यामुळे गुरुवारी रात्रीच टीम जंगलात दाखल झाली. जीपीएस लोकेशननुसार ‘चंदा’चा माग काढण्याचा प्रयत्न सुरू होता; मात्र ती सतत चकवा देत होती. अनुभवी वनमजुरालाही तिचा नेमका थांगपत्ता लागत नव्हता. अखेर रात्री उशिरा ती बराच वेळ थांबलेल्या परिसरात आम्ही दबा धरून बसलो.
वाचा: चांदोलीमध्ये जैवविविधतेची श्रीमंती, जंगलात वन्यजीवांची निर्धास्त भ्रमंतीपहाटे साडेपाचच्या सुमारास रानकोंबड्याची बांग आणि त्यानंतर सांबराचा इशारा ऐकू आला… आणि वातावरणात अचानक हालचाल जाणवली. ‘जीपीएस’वर चंदाची हालचाल सुरू झाल्याचे स्पष्ट झाले. हलकीशी डरकाळी स्पष्ट ऐकू आली. अखेर सकाळी ६:४० वाजता जंगलातील एका मोकळ्या पट्ट्यात चंदाचे थरारक दर्शन झाले. ती ऐटीत पुढे चालत होती आणि आम्ही सुमारे ५० ते ६० मीटर अंतरावरून तिच्या मागोमाग जीपने जात होतो. अचानक तिला आमची चाहूल लागली. तिने डावीकडे शांत वळण घेतले. तत्पूर्वी तिने गंधखुणा सोडल्या. आमच्याकडे भेदक कटाक्ष टाकला आणि काही क्षणांत झपाझप पावले टाकत झाडीत अदृश्य झाली. तीन-चार मिनिटांचा हा क्षण आमच्यासाठी अविस्मरणीय ठरला.
‘चंदा’च्या हालचाली मंदावल्यासह्याद्री व्याघ्रप्रकल्पात २०२३ पासून आपले हद्दक्षेत्र तयार केलेल्या ‘सेनापती’च्या अस्तित्वाची चंदाला जाणीव झाली. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या जोडीचे छायाचित्र टिपले गेले. तेव्हापासून चंदा आणि सेनापती जोडीने सह्याद्रीत फिरत होते. त्यांनी आपली मिलनक्रिया पूर्ण केलेली आहे; यामुळे चंदाच्या हालचाली सध्या मंदावल्या आहेत. वनकर्मचारी तिच्या हालचालींचे निरीक्षण करत आहेत.चांदोलीचे खोरे आवाजांनी दुमदुमलेसध्या चांदोलीचे खोरे या दोघांच्या आवाजांनी दुमदुमून गेले आहे. गेल्या महिन्यापासून या दोघांच्या सोबतच्या वावरामुळे सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाला ‘गुड न्यूज’ मिळणार आहे. रात्री-बेरात्री दोघांच्या गुरगुरण्यातील तफावत निरीक्षकांना जाणवत आहे. चंदा सध्या आपल्या बछड्यांसाठी योग्य जागा शोधत आहे. त्यामुळे तिच्या आवाजात झालेल्या बदलाचीही नोंद करण्यात येत आहे.
Web Summary : A Lokmat team's dawn stakeout in Sahyadri Tiger Reserve yielded a thrilling encounter with tigress Chanda. Her piercing gaze and regal demeanor captivated the team. Chanda's movements have slowed, indicating a possible pregnancy after mating with Senapati. The forest echoes with their calls as Chanda seeks a den.
Web Summary : सह्याद्री टाइगर रिजर्व में 'लोकमत' टीम को बाघिन चंदा का रोमांचक सामना हुआ। उसकी भेदी निगाहों और शाही अंदाज ने टीम को मोहित कर लिया। सेनापति के साथ मिलन के बाद चंदा की चाल धीमी हो गई है, जो संभावित गर्भावस्था का संकेत है। चंदा के मांद खोजने पर जंगल उनकी आवाजों से गूंज रहा है।