छोटा बच्चा जानके इनको...
By Admin | Updated: November 14, 2014 23:14 IST2014-11-14T22:55:36+5:302014-11-14T23:14:10+5:30
रोजच्या कटकटींपेक्षा लहानपण बरं होतं. पण तसं पाहिलं तर आताच्या लहान मुलांचं जगणं पूर्वीसारखं राहिलेलं नाही. त्यांना खूप कमी वयातच खूप मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत

छोटा बच्चा जानके इनको...
नुकताच व्हॉटस्अॅपवर एक मेसेज आला होता. लहान असताना आपल्याला कोणी विचारलं की, कोण व्हायचंय? तर आपल्यासमोर अनेक पर्याय असायचे. बसने प्रवास करताना वाटायचं कंडक्टर व्हावं. बाजारात गेल्यावर वाटायचं आपणही मोठं होऊन दुकान काढायचं. कधी वाटायचं डॉक्टर व्हावं, तर कधी पायलट. जे समोर दिसेल ते आपण व्हावं, असं वाटायचं. पण, मोठं झाल्यानंतर कुणी प्रश्न विचारला की कोण व्हायचंय? तर सर्वसाधारणपणे उत्तर एकच येतं... पुन्हा लहान व्हायचंय. लहान असताना वाटायचं की भरपूर पैसे खर्च करता यावेत, यासाठी आपण लवकरात लवकर मोठं व्हायला हवं. पण मोठं झाल्यावर वाटतं की, रोजच्या कटकटींपेक्षा लहानपण बरं होतं. पण तसं पाहिलं तर आताच्या लहान मुलांचं जगणं पूर्वीसारखं राहिलेलं नाही. त्यांना खूप कमी वयातच खूप मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे आणि म्हणूनच ही लहान मुलं खूप स्मार्ट आहेत. नव्या जगाची परिभाषा असलेल्या अनेक गोष्टी त्यांनी लिलया आत्मसात केल्या आहेत आणि म्हणूनच ‘छोटा बच्चा जानके इनको’ कमी समजण्याची चूक करायला नको. तसं पाहिलं तर प्रत्येक गोष्टीलाच चांगली आणि वाईट बाजू असते. आताच्या मुलांना त्यांचं बालपण जगताच येत नाही, असा आक्षेप अनेक लोक घेतात. पण ते या मुलांची तुलना आपल्या लहानपणाशी करतात आणि आपण केलेलं तेच बरोबर असा सूर उमटायला लागतो. खरंही असेल कदाचित, की त्यावेळी मुलांना टी. व्ही., मोबाईल माहिती नव्हते, त्यामुळे त्यांची मैदानी खेळांशी जवळीक होती. आता ती तेवढी राहिलेली नाही. तेव्हाच्या मुलांकडे मैदानावर जाण्यासाठी वेळ होता. आता आपण आपल्या मुलांना मैदानावर जाऊन खेळण्यासाठी वेळ देतो का? सतत कुठल्या ना कुठल्या क्लासमध्ये असणाऱ्या मुलांकडून पुन्हा मैदानावर खेळायची अपेक्षा करणं अतिरेकाचं आहे. बरं आता आपण मोठ्या माणसांनीच मैदानं शिल्लक ठेवली आहेत का? जिकडे-तिकडे मोकळ्या जागांवर इमारती बांधायची हौस संपतच नाहीये. पालकांना स्वत:ला मुलाला वेळ देता येत नाही म्हणून टीव्हीची सवय वाढत चालली आहे. त्यात या पिढीचा काहीच दोष नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आताच्या लहान मुलांना जितका अभ्यास करायला लागतो आणि ज्या पद्धतीचा अभ्यास करायला लागतो, तसा अभ्यास याआधीच्या पिढ्यांना नव्हता. या अभ्यासाचं स्वरूप खूप कठीण होत चाललंय. घरात कोणी नाही म्हणून एकटे राहण्याची किंवा नातेवाईकांकडे राहण्याची वेळ आल्यामुळे आई-वडिलांपासून मानसिकदृष्ट्या काहीशी दुरावत चाललेली ही पिढी किती मानसिक संघर्ष झेलत असेल, याची कल्पनाही आपल्याला येऊ शकत नाही. शाळेतल्या लहान-सहान गोष्टी, मारामाऱ्या, कौतुक, टीचरनी दिलेला रिमार्क यातलं काहीही ऐकण्यासाठी पालकांकडे वेळ नाही. त्यांच्या मानसिक क्षमतेपेक्षा अधिक ओझं त्यांच्यावर लादलं जातंय का, हे बघण्यासाठी आपल्याला वेळ नाही. तरीही ही पिढी तल्लख होत आहे. घरात नवीन आणलेल्या मोबाईलचा वापर कसा करायचा, हे शिकायला आपल्याला खूप वेळ लागतो. पण, घरातली लहान मुलं त्याबाबतची माहिती देतात. टी. व्ही.वरच्या जाहिराती पाहून मोबाईल, मोटरबाईक, चारचाकी गाड्या याबाबतची अतिशय चांगली माहिती त्यांच्याकडे असते. असंख्य संदर्भ (स्वत:शी निगडीत) ही मुले विसरत नाहीत. आई-वडिलांचं वागणं, त्यांच्या शिकवणुकीतील विसंवाद, त्यांचं इतरांशी असलेलं वागणं, यासारख्या अनेक गोष्टी त्यांच्याकडे ‘स्टोअर’ केलेल्या असतात. आता सर्वात चांगलं आणि ताजं उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण आणि स्वच्छता मोहीम. कुठेही प्रवासाला जाताना गाडीत काहीतरी खायचं आणि खिडकीची काच खाली करून कागद बाहेर टाकून द्यायचे, हा आपल्या सर्वांचा आवडता उद्योग. पण, आता याला आवर घालायचं काम ही मुलंच करतात. मोदींनी सांगितलंय, रस्त्यावर कचरा करायचा नाही. कचरा सगळा एका पिशवीत भरून ठेवा. कचराकुंडी दिसली तरच त्यात टाका, असा सल्ला आता लहान मुले मोठ्यांना देऊ लागली आहेत. त्यांना चांगल्या गोष्टी कळतात. मुलांच्या माध्यमातून एखादी गोष्ट सहज अमलात येऊ शकते, हे मोदींचे विचार आता अनेक ठिकाणी प्रत्यक्षात येऊ लागले आहेत. आजची ही पिढी, त्यांच्याच भाषेत सांगायचं तर स्मार्ट आहे. नो उल्लू बनाविंग, हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. त्यांची निरीक्षण शक्ती खूप अफाट आहे. त्यांच्यासमोर बोलताना, वागताना जपून राहावं लागतं. अर्थात ही पिढी स्मार्ट आहे म्हणजे स्वयंपूर्ण नाही. या पिढीला सर्वात जास्त गरज कशाची असेल तर ती मानसिक आधाराची, संवादाची. त्यांच्या शाळेत दिवसभरात काय काय झालं, हे जेव्हा ती सांगतात ना तेव्हा काळजीपूर्वक ऐकायची. एवढं केलं तरी त्यांची वाढ निकोप आणि सुदृढ होईल, हे नक्की!--मनोज मुळ्ये