शासनाकडून लिंगायत समाजाची फसवणूक
By Admin | Updated: September 7, 2014 23:25 IST2014-09-07T21:49:09+5:302014-09-07T23:25:47+5:30
बी. एस. पाटील : लिंगायत धर्म महासभा मेळावा

शासनाकडून लिंगायत समाजाची फसवणूक
कोल्हापूर : लिंगायत समाजाच्या मागण्यांबाबत राज्य शासनाने घेतलेला निर्णय दिशाभूल करणारा आहे. मूळ मागण्यांकडे डोळेझाक करीत समाजाची फसवणूक केली आहे, अशी टीका लिंगायत धर्म महासभेचे राज्य सरचिटणीस बी. एस. पाटील यांनी आज, शनिवारी येथे केली. शासनाच्या या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
राजर्षी शाहू स्मारक भवन येथे लिंगायत धर्म महासभेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
पाटील म्हणाले, लिंगायत हा स्वतंत्र धर्म असून त्यास संविधानिक मान्यतेसाठीचा प्रस्ताव राज्य शासनाने ठराव करून केंद्र सरकारकडे पाठविणे आवश्यक होते. जैन धर्माचे संस्थापक भगवान महावीर, इस्लाम धर्माचे संस्थापक महंमद पैगंबर, शीख धर्माचे संस्थापक गुरूनानक, त्याप्रमाणेच लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर आहेत. लिंगायत हा धर्म असूनही या धर्माची ‘हिंदू धर्मातील जात’ अशी नोंद झाली आहे. शासनाच्या या चुकीच्या नोंदीविरोधात लिंगायत धर्म महासभेने आवाज उठविला. राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे प्रस्ताव पाठविणे गरजेचे असताना केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे सांगून दिशाभूल केली आहे.
यावेळी अॅड. एस. एम. पाटील, महिला राज्याध्यक्षा वैशाली पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य शंकर बिराजदार, महिला जिल्हाध्यक्षा प्रमिला नवणे यांचे भाषण झाले. महिला शहराध्यक्षा गीता संजय वडगुले यांनी स्वागत केले. यावेळी
प्रा. दत्तात्रय तोडकर, दिलीप देशमुख, अॅड. एस. एस. कोट, अॅड. प्रकाश महाजन, डॉ. नितीन माळी, शुभांगी पाटील, गणेश चौगुले उपस्थित होते. (प्रतिनिधी)