सुविधा देताना खोतवाडी ग्रामपंचायतीला मर्यादा
By Admin | Updated: September 26, 2015 00:14 IST2015-09-25T23:51:20+5:302015-09-26T00:14:38+5:30
प्राथमिक सोयी-सुविधांचीही वानवा : पार्वती औद्योगिक वसाहतीमुळे गावास महत्त्व, वस्त्रोद्योगासह इतर उद्योगांची उभारणी --मोठ्या गावांच्या मोठ्या समस्या

सुविधा देताना खोतवाडी ग्रामपंचायतीला मर्यादा
घन:शाम कुंभार - यड्राव --पार्वती औद्योगिक वसाहतीमुळे या गावास महत्त्व प्राप्त झाले आहे. गावास उद्योगाचे वातावरण मिळाल्याने वस्त्रोद्योगासह इतर उद्योगांची उभारणी वाढीव भागात झपाट्याने होत आहे. येथील लोटस् पार्क निर्मितीमुळे औद्योगिकीकरणाचे वलय प्राप्त झाले आहे. मात्र, त्या मानाने आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधांचा अभाव स्पष्टपणे दिसत आहे.सुविधा देताना खोतवाडी ग्रामपंचायतीला मर्यादा
प्राथमिक सोयी-सुविधांचीही वानवा : पार्वती औद्योगिक वसाहतीमुळे गावास महत्त्व, वस्त्रोद्योगासह इतर उद्योगांची उभारणी --मोठ्या गावांच्या मोठ्या समस्या खोतवाडी गावची लोकसंख्या सुमारे सात हजारांच्या आसपास आहे. या गावचा विस्तार वाढ तारदाळ गावच्या दक्षिणेस व शहापूर गावच्या उत्तरेस झाला आहे. उद्योग व त्यासाठी आवश्यक असणारा कर्मचारीवर्ग बहुतांशी या परिसरात वास्तव्यास आहे. गावामध्ये शुद्ध पाणी, सांडपाणी निचरासाठी गटार व्यवस्था, कचरा उठावासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा अभाव, गावच्या विस्तारित भागामध्ये रस्ते सपाटीकरण, खडीकरणाचा अभाव आहे. सार्वजनिक शौचालय नसल्याने निर्मलग्रामची अंमलबजावणी करता येत नाही. ग्रामपंचायतीची राखीव जागा नसल्याने अंगणवाडी व सार्वजनिक शौचालयाची उभारणीच करता येत नाही. अंगणवाडीसाठी शासकीय निधी उपलब्ध असूनही जागेअभावी निधीचा वापर नाही.
लोटस् पार्कमध्ये आॅटोलूमचा वस्त्रोद्योग संघटितपणे उभारला आहे. यामध्ये रस्ते व्यवस्थित नाहीत. स्वच्छतेचा अभाव आहे. मागावर काम करणाऱ्या कामगारांना समान मजुरीची अंमलबजावणी व्हावी. यंत्रमागधारकांची एकजूट, कामगारांसाठीच्या सेवा-सुविधांच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याने कामगार टंचाई भासते. यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे.
कामगारांना जादा पैसे उचल देणे उद्योजकांनी थांबवावे. उद्योजकांमध्ये संघटितपणा असावा. कामगारांना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी उद्योजकांची आहे. समान पगार, समान सोयी-सुविधा झाल्यास कामगार टंचाई भासणार नाही. पर्यायाने या उद्योगावर अवलंबून असणारे इतर उद्योगही चांगल्या पद्धतीने चालतील.
खोतवाडी गाव व विस्तारित भागात रस्ते, पथदिवे, गटारी यांच्या सोयी-सुविधा झाल्यास ग्रामस्थांना संघर्ष करावा लागणार नाही. सार्वजनिक शौचालयांची उभारणी आवश्यक आहे. पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत असल्याने ओढ्यावर बंधारा बांधल्यास त्याची योग्य निगा राखल्यास वापरासाठी पाणी वापर होईल. ग्रामपंचायतीचे ओपन स्पेस मूळ मालकच पुनर्वापर करत असल्याने सार्वजनिक वापरासाठी जागा शिल्लक नाही. यामुळे प्रशासकीय कारभार उघडकीस येत आहे. याबाबत कायदेशीर बाबी तपासून सार्वजनिक वापरासाठी जागा ताब्यात घेणे ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. वाढीव भागात ग्रामस्थांना आवश्यक सेवा-सुविधा पुरविण्याची जबाबदारीही ग्रामपंचायतीची आहे. त्यानुसार योग्य नियोजन झाल्यास शासकीय निधीचा वापर करून ग्रामस्थांना सुविधा पुरविल्यास खऱ्या अर्थाने शासनाचा प्रतिनिधी म्हणून ‘ग्रामसेवक’ असे मानले जाईल.
सार्वजनिक सेवा-सुविधा देण्यासाठी ग्रामपंचायतीकडे जागा नाही. जागा खरेदीसाठी निधी नाही. यामुळे विस्तारित भागास सुविधा देण्यास मर्यादा आहेत. समाजमंदिर नसलेले हे एकमेव गाव आहे. समाजमंदिरासाठी शासनाकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
- शोभा शेटके, माजी सरपंच
खोतवाडीच्या विस्तारित भागात रस्ते, गटारी व स्वच्छतेची व्यवस्था करावी. अंगणवाडी, सार्वजनिक शौचालय, समाजमंदिराची उभारणी व्हावी. लोकप्रतिनिधींनी गावच्या विकासासाठी सहकार्य करण्याची अपेक्षा आहे.
- आनंदराव साने, ग्रामस्थ.