कोल्हापुरात लाईट, कॅमेरा ॲक्शन सुरू, मालिकांच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 18:28 IST2020-06-27T18:25:48+5:302020-06-27T18:28:02+5:30
दीड महिन्याच्या प्रयत्नांनंतर अखेर कोल्हापुरात मालिकेच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींनुसार केर्ली येथे झी मराठी वाहिनीवरील ह्यतुझ्यात जीव रंगलाह्ण या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली.

कोल्हापुरातील केर्ली येथे दूरचित्रवाहिनीवरील मालिकेच्या चित्रीकरणाला प्रारंभ झाला.
कोल्हापूर : दीड महिन्याच्या प्रयत्नांनंतर अखेर कोल्हापुरात मालिकेच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींनुसार केर्ली येथे झी मराठी वाहिनीवरील ह्यतुझ्यात जीव रंगलाह्ण या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली.
कोरोनाच्या संसर्गामुळे मार्च महिन्यात केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यावर चित्रपट व मालिकांचे चित्रीकरणही थांबवण्यात आले. त्यामुळे सर्वच वाहिन्यांचा टीआरपी सध्या घसरला आहे. कोल्हापुरात रुग्णसंख्या कमी असल्याने येथे चित्रीकरण सुरू व्हावे यासाठी व्यावसायिकांनी मोठे प्रयत्न केले होते.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुढाकार घेऊन चित्रीकरणास परवानगी दिली. मात्र चॅनेल्सशी बोलणी, तांत्रिक बाबी, शासकीय मान्यता यांची पूर्तता करण्यास दीड महिना गेला. अखेर शुक्रवारपासून प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरुवात झाली. सोशल डिस्टन्सिंगची खबरदारी घेत सेटचे निर्जंतुकीकरण, कलाकार व कामगारांना मास्क, सॅनिटायझरचा वापर, थर्मल स्कॅनिंग, चित्रीकरणावेळी आवश्यक तेवढ्याच व्यक्तींची उपस्थिती या नियमांचे पालन करून चित्रीकरण करण्यात येत आहे.
कोल्हापूरसोबतच सावंतवाडी येथे रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या चित्रीकरणासाठीही येथील कलावंत व तंत्रज्ञांची टीम सेटवर पोहोचली आहे. तेथेही पुढील चार-पाच दिवसांत चित्रीकरण सुरू होईल.
एकाच वेळी प्रदर्शन
मालिकांचे चित्रीकरण सुरू झाले असले तरी त्याच्या एडिटिंगसाठी तांत्रिक बाबी पूर्ण होऊन टीव्हीवर मालिका प्रदर्शित होण्यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. सर्व मराठी मालिका एकाच वेळी सुरू करण्यात येणार असल्याने प्रेक्षकांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.