वाळू ठेकेदारांच्या नदीत उड्या

By Admin | Updated: July 16, 2014 01:00 IST2014-07-16T00:47:32+5:302014-07-16T01:00:20+5:30

शिरोळमध्ये वाळू उपशातून चांदी : महसूल विभागालाही मिळाले उत्पन्न

Lift the sand contractor in the river | वाळू ठेकेदारांच्या नदीत उड्या

वाळू ठेकेदारांच्या नदीत उड्या

संदीप बावचे - शिरोळ
वाळूचे आगर म्हणून समजल्या जाणाऱ्या शिरोळ तालुक्यात एकीकडे नदीत कमी प्रमाणात असणारे पाणी, त्यातच अत्यल्प पावसामुळे वाळू उपसाधारकांनी अक्षरश: नदीतच उडी घेतली आहे. एरव्ही जूनच्या पंधरावड्यात पाणी किंवा पुरामुळे बंद होणारा वाळू उपसा यंदा मात्र पाऊस नसल्याने तब्बल महिना ते दीड महिना सुरू राहिल्याने वाळू उपसाधारकांची लाखोंची चांदीच चांदी झाली आहे.
शिरोळ तालुक्याला कृष्णा नदीचे विशाल पात्र लाभले आहे. पावसाळा संपला व नदीचे पाणी कमी झाले की, येथे वाळू उपसाधारकांची परवाना घेऊन वाळूचे डेपो मारण्याची लगबग उडते. जुलैच्या शेवटच्या तारखेपर्यंत परवाना घेऊन पावसाच्या कृपेवर व उपलब्ध मजुरांचा ताळमेळ घालून वाळू उपसा केला जात होता. यंदा सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. पण, यावर्षी मात्र वाळू उपसाधारकांवर पाऊस चांगलाच फिदा झाला आहे. आतापर्यंत पाऊसच न पडल्याने व नदीच्या पाणी पातळीत वाढ न झाल्याने उपसा करून मोठ्या प्रमाणात वाळूचे ढीग दिसू लागले आहेत. नदीपात्रातून दिवसरात्र वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र आहे. तालुक्यात नदी पलीकडील सात गावांमध्ये अनेक ठिकाणी सध्या जोरात वाळू उपसा सुरू आहे. एक वाळू उपसाधारक दिवसाला किमान ८० ब्रासहून अधिक वाळू उपसा करतो. त्यानुसार एका ब्रासला साडे चार हजार रूपये किमतीची वाळू मिळते. याचा हिशोब केल्यास लाखो रूपयांच्या घरात हा हिशोब जातो.
एरव्ही शिरोळ आणि त्याठिकाणी असणारा बेकायदा वाळू उपसा हा नेहमीच चर्चेचा व वादाचा विषय ठरला असताना पावसाने दडी मारलेली पाहून नदीत उडी घेऊन वाळूचे डेपो अशाच पद्धतीने मारण्यात आले आहेत. सध्या तालुक्यातील काही गावांमध्ये बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाने दडी मारली होती. सध्या अत्यल्प प्रमाणात पाऊस सुरू असला, तरी वाळू उपसा मात्र बंद नाही. सप्टेंबरपर्यंत वाळू उपसा करण्याची अंतिम मुदत असल्याने वाळूचा उपसा करून त्याचे ढीग मारण्यात उपसाधारक मग्न असल्याचे चित्र आहे. एकीकडे वायूच्या वेगाने वाढणारी सिमेंटच्या इमारतीची जंगले, तर दुसरीकडे वाढलेल्या वाळूच्या किंमती याबाबी लक्षात घेऊन वाळूचा साठा करून व टंचाई करून वाळू उपसाधारकांचे उखळ पांढरे करणार, यात तिळमात्र शंका नाही.

Web Title: Lift the sand contractor in the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.