‘जीवनदायी’ योजनेचा पंचनामा होणार !

By Admin | Updated: September 4, 2014 00:08 IST2014-09-04T00:07:02+5:302014-09-04T00:08:34+5:30

जिल्हा परिषदेत चौकशीचा निर्णय : अनेक गैरप्रकारांवरून आरोग्य विभागाच्या बैठकीत जोरदार चर्चा

Life Insurance Scheme | ‘जीवनदायी’ योजनेचा पंचनामा होणार !

‘जीवनदायी’ योजनेचा पंचनामा होणार !

कोल्हापूर : राजीव गांधी जीवनदायी योजनेमधून आतापर्यंत झालेल्या प्रकरणाची चौकशी करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या बैठकीत आज करण्यात आला. येत्या चार दिवसांत संबंधितांना बोलावून योजनेचा पंचनामा करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. अध्यक्षस्थानी आरोग्य समितीचे सभापती अनिल मादनाईक होते.
राज्य शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली, पण त्याचा उपयोग लाभार्र्थींना होत नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. याबाबत ‘लोकमत’ने या योजनेच्या कारभाराचा पर्दाफाश करत हा विषय लावून धरला होता. त्याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या बैठकीत उमटले. योजना चांगली आहे, पण त्याची देखरेख करण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याचे सांगत जिल्हा परिषद सदस्य अर्जुन आबीटकर यांनी हा विषय लावून धरला. हॉस्पिटलकडून सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी लाभार्थींच्या असल्याचे निदर्शनास आणून देत आतापर्यंत झालेल्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचा ठराव आबीटकर यांनी मांडला.
उपचारानंतर शासनाकडून वेळेत पैसे मिळत नाहीत, उपचाराएवढेच पैसे शासनाकडून मिळत असल्याने डॉक्टर टाळाटाळ करत असल्याचा आरोप काही सदस्यांनी केला. एक जिल्हा समन्वयक व दोन कर्मचारी यावर या योजनेचा डोलारा सुरू असल्याचे सांगत कोण काय करते, हेच कळत नाही. ग्रामीण जनतेसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या योजनेकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे अर्जुन आबीटकर यांनी निदर्शनास आणून दिले.
यावर येत्या चार दिवसांत आतापर्यंत झालेल्या प्रकरणाची चौकशी करण्याचा ठराव झाला. बैठकीला सदस्य शहाजी पाटील, परशुराम तावरे, मानसिंग पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. एस. आडकेकर, आदी उपस्थित होते.

Web Title: Life Insurance Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.