कोल्हापुरातून विमानसेवेला पुन्हा परवाना, मार्ग मोकळा; आता ७२ आसनी विमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 16:25 IST2018-12-01T16:22:31+5:302018-12-01T16:25:05+5:30
थ्रीसी-व्हीएफआर परवाना मिळाल्याने कोल्हापुरातून नागरी विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोल्हापूर विमानतळाला परवाना मिळाल्याची माहिती भारतीय नागरी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कळविली असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांना सांगितले.

कोल्हापुरातून विमानसेवेला पुन्हा परवाना, मार्ग मोकळा; आता ७२ आसनी विमान
कोल्हापूर : थ्रीसी-व्हीएफआर परवाना मिळाल्याने कोल्हापुरातून नागरी विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोल्हापूरविमानतळाला परवाना मिळाल्याची माहिती भारतीय नागरी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कळविली असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांना सांगितले.
कोल्हापूर विमानतळावरील धावपट्टीच्या त्रुटींची पूर्तता झाली नसल्याने या ठिकाणी मोठी विमाने उतरण्याचा परवाना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) मिळाला नाही. अलायन्स एअर कंपनीकडून ७२ आसनी विमानाच्या माध्यमातून हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर विमानसेवा दि. १ नोव्हेंबरपासून सुरू केली जाणार होती. मात्र, हा परवाना मिळाला नसल्याने या सेवेची सुरुवात झाली नाही.
त्यातच ‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द करण्यात आली. अशा परिस्थितीत कोल्हापूर विमानतळाच्या हवाई परवान्याचा तांत्रिक मुद्दा उपस्थित झाला. त्यामुळे कोल्हापूरची विमानसेवा बंद झाली. त्यानंतर विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळाची पाहणी केली.
विमानतळ व्यवस्थापनाने विविध तांत्रिक बाबींची पूर्तता केली. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित पाहणीचा अहवाल नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ‘डीजीसीए’ला सादर केला. त्यानंतर ११ दिवसांनी शुक्रवारी थ्रीसी-व्हीएफआर परवाना मिळाला आहे. हा परवाना मिळाल्याने आता नागरी विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोल्हापूर-मुंबई, बंगलोर सेवा सुरू होईल
या परवान्यासाठी नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू आणि ‘डीजीसीए’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याची भेट घेतली. त्याचे फलित म्हणून कोल्हापूर विमानतळाला थ्रीसी-व्हीएफआर परवाना देण्यात आला. त्यामुळे कोल्हापुरातून ७२ आसनी विमानाचे उड्डाण होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
‘अलायन्स एअर’ची हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर आणि इंडिगो कंपनीची हैदराबाद-कोल्हापूर-तिरूपती, कोल्हापूर-मुंबई या मार्गावर विमानोड्डाण सुरू होईल, असे खासदार महाडिक यांनी सांगितले.