लक्ष्मीवाडीचे पुनर्वसन करू: पालकमंत्री सतेज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:17 IST2021-06-28T04:17:10+5:302021-06-28T04:17:10+5:30
गांधीनगर : विमानतळ प्रश्नी लक्ष्मीवाडी येथील भूमीपुत्रांची घरे व जमिनी अतिरिक्त ६४ एकर भूसंपादनामध्ये जाणार असून, येथील सर्व ...

लक्ष्मीवाडीचे पुनर्वसन करू: पालकमंत्री सतेज पाटील
गांधीनगर : विमानतळ प्रश्नी लक्ष्मीवाडी येथील भूमीपुत्रांची घरे व जमिनी अतिरिक्त ६४ एकर भूसंपादनामध्ये जाणार असून, येथील सर्व ४२ घरांचे संपूर्ण पुनर्वसन करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. ते लक्ष्मीवाडी येथील प्रकल्पग्रस्तांसोबत आयोजित बैठकीत बोलत होते.
यावेळी त्यांनी संपादित होणाऱ्या ६४ एकर जागेची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून याबाबत सविस्तर माहिती घेतली. आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांचे संपूर्ण समाधान झाल्याखेरीज अंतिम निर्णय घेतला जाणार नाही, अशी ग्वाही दिली.
शिवसेनेच्यावतीने यावेळी संपूर्ण पुनर्वसन, नोकरीमध्ये प्राधान्य, प्रकल्पग्रस्तांना पाचपट दराने नुकसानभरपाई, प्रकल्पग्रस्त दाखला, याबरोबरच गडमुडशिंगीतील सर्वाधिक जागा विविध शासकीय प्रकल्पांसाठी संपादित केल्या जात असून, हा एकप्रकारचा अन्याय असल्याचे परखडपणे नमूद केले. प्रकल्पग्रस्तांच्यावतीने विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. तसेच धनगर समाजानेही मेंढपाळ व पशुपालन यांच्यासाठी व कोंडवाडासाठी जागा यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, यासंबंधी परिसरातील सर्व गावांच्या पशुपालकांच्या हिताचे रक्षण करण्याविषयीचे निवेदन देण्यात आले. यावेळी करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, विमानतळ प्राधिकरणाचे कमल कुमार कटारिया, करवीर भूमी अभिलेखचे सुधाकर पाटील, न्यू वाडदे उपसरपंच दत्ता पाटील, विजय पाटील, शिवसेना उपप्रमुख पोपट दांगट उपस्थित होते.
धनगर समाजाच्यावतीने निवेदन
गडमुडशिंगी धनगर समाजाच्यावतीने ६४ एकर भूसंपादनामध्ये समाजाला दिलेल्या जमिनीचा समावेश करू नये. गडमुडशिंगी, नेर्ली, तामगाव, उजळाईवाडी, वसगडे, उचगाव, वळीवडे या भागातील पशुपालक व मेंढपाळांना विमानतळ विस्तारीकरणामुळे चराऊ कुरण व कोंडवाडे कमी झाले असून, मेंढपाळ व्यवसाय अडचणीत आले आहेत. या व्यावसायिकांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याची विनंती करण्यात आली.
फोटो ओळ :-
लक्ष्मीवाडी (गडमुडशिंगी) येथील प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, वैभव नावडकर, कमल कुमार कटारिया उपस्थित होते.