कंत्राटी कामगार कायद्यात बदल केल्यास रस्त्यावर उतरू : जगताप
By Admin | Updated: December 5, 2014 00:46 IST2014-12-05T00:44:55+5:302014-12-05T00:46:01+5:30
राज्य सरकारकडून दुजोरा दिला जात आहे

कंत्राटी कामगार कायद्यात बदल केल्यास रस्त्यावर उतरू : जगताप
कोल्हापूर : कंत्राटी कामगारांना दहा वर्षांत कायम करावे, अशी कायद्यात तरतूद असताना, या कायद्यामध्येच बदल करण्याचा घाट केंद्र सरकारकडून सुरू आहे. त्याला राज्य सरकारकडून दुजोरा दिला जात आहे. या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात आपण रस्त्यावर उतरणार असून, याच पद्धतीने कष्टकऱ्यांच्या बाबतीत सरकार डोळ्यांवर झापड लावून चालल्यास प्रसंगी हिंसक आंदोलन करू, असा इशारा आज, गुरुवारी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस आमदार भाई जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिला.
जगताप म्हणाले, सध्या कामगार कायदे बदलण्याचा घाट घातला जात आहे. वाढत चाललेली कंत्राटी कामगारांची संख्या हासुद्धा एक ज्वलंत विषय झालेला आहे. वाढती महागाई आणि व्यवस्थापनाचे कामगारांना कमीत कमी पगारात राबविण्याचे धोरण त्याचबरोबर कंत्राटीकरण याविरुद्ध आंदोलन करण्याची स्थिती निर्माण झाली आहे. कंत्राटी कामगार कायम नसल्याने आम्हाला परवडत नाही, या नावाखाली कायद्याने कामगारांसाठी अभिप्रेत असणाऱ्या सुविधा व फायदे कंपन्यांकडून दिले जात नाहीत. राज्यात नव्यानेच सत्तेवर आलेल्या सरकारने कोणती तत्परता दाखविली असेल तर ती म्हणजे केंद्र सरकारने घाट घातलेल्या कंत्राटी कामगार कायद्यात बदल करण्याची तयारी दर्शविली आहे.
त्याचबरोबर कॉँग्रेस सत्तेत असणाऱ्या ५८ वर्षांच्या कार्यकाळात कंपन्या बंद करण्याची परवानगी सरकारने कधीही कंपनीच्या मालकांना दिली नाही परंतु आता कामगार संख्येचे कारण पुढे करत त्या बंद करण्याची परवानगी देण्याचे षङ्यंत्र भाजप सरकारकडून रचले जात आहे. ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामध्ये राजस्थान, मध्यप्रदेश, गोवा आदी राज्यांमध्ये हे धोरण राबविले आहे. महाराष्ट्रात अद्याप हा निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नसली तरी त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. त्याला कडाडून विरोध केला जाणार आहे, असे ते म्हणाले.
विरोधी पक्षनेता काँग्रेसचाच ं
विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांची संख्या राष्ट्रवादी कॉँग्रेसपेक्षा जास्त आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेता हा आमचाच होईल, असा विश्वास काँग्रेसचे नेते आमदार भाई जगताप यांनी आज, गुरुवारी येथे व्यक्त केला. त्याचबरोबर ‘एकांडा शिलेदार’ असा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या ताकदीवर ६३ आमदार निवडून आणून आपले नेतृत्व सिद्ध केले, असेही ते म्हणाले.