कुंभीचे आर्थिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:25 IST2021-08-15T04:25:42+5:302021-08-15T04:25:42+5:30
कोपार्डे : कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या कामगारांचे पगार, निवृत्तीनंतरची देणी, सवलतीची साखर, तोडणी वाहतूक अशी देणी थकल्याने सर्व घटकांमध्ये ...

कुंभीचे आर्थिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य करू
कोपार्डे : कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या कामगारांचे पगार, निवृत्तीनंतरची देणी, सवलतीची साखर, तोडणी वाहतूक अशी देणी थकल्याने सर्व घटकांमध्ये अविश्वासाचे वातावरण आहे. यातून कारखान्याची आर्थिक कोंडी झाली असेल तर या सर्व घटकांना विश्वासात घेऊन आर्थिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही आपल्या बरोबर आहे, अशी ग्वाही यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी दिली. शाहू आघाडीच्यावतीने शनिवारी विविध मागण्यांचे निवेदन ‘कुंभी’चे उपाध्यक्ष निवास वातकर व कार्यकारी संचालक अशोक पाटील यांना देण्यात आले. यावेळी एकनाथ पाटील म्हणाले, सवलतीचे साखरेचे दर वाढवूनही सभासदांना वेळेत सवलतीची साखर मिळेना. कारखान्यावर कर्जाच्या व्याजाचा बोजा पडत आहे. यासाठी यशवंत बँकेकडून दिलेल्या कर्जावरील दोन टक्के व्याज कमी करण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले. यावेळी कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी सध्या साखरेला चांगला दर मिळत असून उठाव वाढल्याचे सांगितले. कारखान्याने कामगारांच्या पगाराचा बॅकलॉग भरून काढला असून सवलतीची साखर सुरू करणार असल्याची ग्वाही दिली. तोडणी वाहतुकीची ११ कोटींची बिले दिली असून सर्वांना विश्वासात घेऊन कारखान्याच्या आर्थिक अडचणीवर मार्ग काढणार असल्याचे सांगितले.
यावेळी राजेंद्र सूर्यवंशी, टी. एल. पाटील, आनंदराव पाटील, निवास पाटील उपस्थित होते.
फोटो : १४ कुंभी कारखाना निवेदन
कुंभी-कासारी कारखान्याचे उपाध्यक्ष निवास वातकर व कार्यकारी संचालक अशोक पाटील यांना शाहू आघाडीच्यावतीने निवेदन देताना एकनाथ पाटील, बाळासाहेब खाडे, निवास पाटील, सर्जेराव पाटील, दादासो कामिरे.