‘जयप्रभा’ भूखंड विभाजनाचा डाव हाणून पाडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 17:47 IST2020-01-29T17:44:51+5:302020-01-29T17:47:05+5:30
कोल्हापूर : कोल्हापूरच्या अस्मितेचा मानबिंदू असणाऱ्या जयप्रभा स्टुडिओच्या भूखंडाचे विभाजन करण्याचा डाव हाणून पाडू, असा इशारा अखिल भारतीय सिने ...

‘जयप्रभा’ भूखंड विभाजनाचा डाव हाणून पाडू
कोल्हापूर : कोल्हापूरच्या अस्मितेचा मानबिंदू असणाऱ्या जयप्रभा स्टुडिओच्या भूखंडाचे विभाजन करण्याचा डाव हाणून पाडू, असा इशारा अखिल भारतीय सिने वर्कर्स असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष संजय पाटील यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
पत्रकात म्हटले, जयप्रभा स्टुडिओच्या भूखंडाचे विभाजन करण्याचा प्रस्ताव हा चित्रपंढरीला काळिमा फासणारा आहे. स्टुडिओची मूळ जागा आणि वास्तू यांचे विभाजन करण्याचा डाव आम्ही संघटनेतर्फे हाणून पाडू.
हेरिटेज समितीने मूळ वास्तूच्या संवर्धनाबाबत आराखडा सादर करावा, असे आदेश दिले असतानाही त्याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. उच्च न्यायालयानेही ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिलेला आहे. स्टुडिओच्या सव्वातीन एकर जागेमागे लागण्यापेक्षा महापालिकेने विकासकाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी.
प्रशासनाला हाताशी धरून या भूखंडात टोलेजंग इमारत उभारण्याचा विकासकाचा घाट सुरू आहे. हा भूखंड हडपण्यासाठी सुरू असलेल्या हालचालींना आमचा ठाम विरोध राहणार आहे. छत्रपती राजाराम महाराज, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या मूळ तत्त्वाला हरताळ फासून न्यायालयाचा अवमानही केला जात असल्याचे पत्रकात म्हटले आहे. यामुळे या स्टुडिओची एक इंचभरही जागा आम्ही सोडणार नाही; त्यासाठी जनआंदोलन छेडण्याचा इशारा अध्यक्ष संजय पाटील यांनी दिला आहे.