जिल्हा नियोजन बैठकीकडे शिवसेना आमदारांची पाठ
By Admin | Updated: November 25, 2015 00:42 IST2015-11-24T23:40:45+5:302015-11-25T00:42:30+5:30
१३६ कोटी मंजूर : कोयनेचे अवजल चिपळूण, खेडच्या ३५ गावांना

जिल्हा नियोजन बैठकीकडे शिवसेना आमदारांची पाठ
रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीच्या मंगळवारच्या वार्षिक आराखडा निश्चित करणाऱ्या बैठकीकडे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार भास्कर जाधव, चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण व राजापूरचे सेनेचे आमदार राजन साळवी यांनी पाठ फिरविली. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या सेनेच्याच दोन आमदारांनी बैठकीकडे पाठ फिरविल्याने त्यामागे नेमका कोणता राजकीय अर्थ दडला आहे, असा सवाल निर्माण झाला असून, राजकीय भूकंपाची ही पूर्वसूचना असल्याची चर्चा आता रंगात आली आहे.
जिल्हा नियोजन समितीची बैठक मंगळवारी पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जगदीश राजापकर, खासदार विनायक राऊत, आमदार हुस्नबानू खलिपे, उदय सामंत, संजय कदम, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, कोकण विभागाच्या नियोजन विभागाचे उपायुक्त मकरंद देशमुख, उपविभागीय अधिकारी प्रसाद उकार्डे यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि यावेळी अधिकारी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत पालकमंत्री वायकर यांनी सभेतील कामकाजाची माहिती दिली. त्यामध्ये शासनाच्या नियोजन विभागाकडील १३ आॅगस्ट २०१५ च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार लहान गटाने तयार केलेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या सन २०१६-१७ साठीच्या १३६ कोटींच्या विशेष घटक योजनेच्या चार कोटी सहा लाखांच्या आणि आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्राच्या एक कोटी २२ लाखांच्या प्रारूप आराखड्यास राज्यस्तरीय बैठकीत ठेवण्यासाठी शिफारस केली.
देवरुखच्या शासकीय रुग्णालयात दहा, तर दापोलीत ५० खाटा वाढविल्या जाणार आहेत. कुवाँरबावमधील एन. सी. सी. इमारत बांधकाम, आय. टी. आय.साठी अधिक खोल्या देणे, खेडमधील शासकीय विश्रामगृह तसेच तेथील मुख्य प्रशासकीय इमारत उभारण तसेच पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी या दोन्ही पर्यटनस्थळांच्या ठिकाणी सर्चिंग टॉवर उभारले जाणार आहेत. जीवनरक्षकांना नावीन्यपूर्ण योजनेतून प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबर त्यांना आवश्यक साहित्य देण्याच्या प्रस्तावाला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता दिली.
कोयना अवजल चिपळूण, खेडला
कोयनेचे वाया जाणारे अवजल चिपळूण व खेडमधील टंचाईग्रस्त ३५ गावांना कसे देता येईल, याचे पाणी खात्यामार्फत सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी १३ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली.चिपळूणमधील सुमारे ३० गावांना पंपाद्वारे पुरविण्यात येणारे पाणी नैसर्गिक गुरुत्वबलाने पुरवठा करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
ड्रेझर ते डोझर...
दोन वर्षांपूर्वी रत्नागिरी, मिरकरवाडा येथे वाळू उपसा कामासाठी आणलेला सीडीसमर्थ ड्रेझर बिघडलेल्याच स्थितीत आहे. त्याची दुरुस्तीही करण्यात आली. मात्र, ड्रेझर काही सुरू झाला नाही.
आता जिल्हा नियोजनतर्फे नदीतील गाळ उपसा कामासाठी छोट्या स्वरूपातील डोझर आणण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. हा डोझर येत्या मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात येणे अपेक्षित असल्याचे पालकमंत्री वायकर यांनी सांगितले.
किनारा सुरक्षिततेसाठी सर्च मोहीम सुरू
सागरी किनारा सुरक्षितता हा विषय महत्त्वाचा बनला असून, सागरी सुरक्षिततेला सर्वाधिक महत्त्वही दिले जात आहे. रत्नागिरीच्या सागरी क्षेत्रात अनेक बेकायदा मच्छिमारी नौका
वावरत असल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे.
त्यानुसार सर्च मोहीम सुरू करण्यात आली आहे. सागरी सुरक्षेसाठी रत्नागिरीत विविध विभागांकडे असलेल्या स्पीड बोटी सुरू नसल्याची चर्चा असून, त्यांची चाचणी तातडीने घेतली जाईल, असे वायकर यांनी सांगितले.