गेल्या जूनच्या तुलनेत निम्माच पाऊस

By Admin | Updated: July 1, 2016 00:33 IST2016-07-01T00:33:29+5:302016-07-01T00:33:59+5:30

जोरदार पावसाची प्रतीक्षा : गगनबावड्यात सर्वाधिक ५६ मि.मी. पावसाची नोंद; शहरात जोर; ग्रामीण भागात रिपरिप

Less than the previous June's rainfall | गेल्या जूनच्या तुलनेत निम्माच पाऊस

गेल्या जूनच्या तुलनेत निम्माच पाऊस

कोल्हापूर : पावसाने सुरुवात केली असली तरी, गेल्या जूनच्या तुलनेत यंदा निम्माच पाऊस झाला आहे. यावर्षीच्या जूनमध्ये सरासरी १९०.६३ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. त्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ५५८ तर, त्यापाठोपाठ शाहूवाडीमध्ये २९३.५० मिलीमीटर पाऊस झाला आहे. कोल्हापूरकरांना वरूणराजाच्या दमदार हजेरीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. दरम्यान, जिल्ह्यात पावसाने गुरुवारी सर्वत्र हजेरी लावली तरी बुधवारच्या तुलनेत ग्रामीण भागात विशेषत: धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी होता. उलट शहरात पावसाचा जोर चांगला राहिला. चोवीस तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ५६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात वळीव झाला. मृग नक्षत्रामध्ये पावसाने काहीशी हुलकावणी दिली. मान्सूनचे दि. २३ जूनला आगमन झाले. त्यानंतर सातत्याने पाऊस सुरू आहे. गगनबावडा, शाहूवाडी, चंदगड तसेच राधानगरी धरण क्षेत्रात दमदारपणे पाऊस सुरू आहे. त्यातून जूनमध्ये सरासरी १९०.६३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
वार्षिक सरासरीच्या तुलनेत त्याची टक्केवारी १०.७६ इतकी आहे. हा पाऊस २०१४ मधील जूनच्या तुलनेत ७५.५३ मिलीमीटर अधिक असून गेल्यावर्षीपेक्षा २१७.२० मिलीमीटर कमी आहे. हे प्रमाण आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. दोन वर्षांप्रमाणे यावर्षीदेखील गगनबावडा, शाहूवाडी, चंदगड, आजरा, राधानगरीतील पावसाचे प्रमाण चांगले आहे. दरम्यान, जूनमधील पावसाबाबत शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांनी सांगितले की, मान्सूनच्या लांबलेल्या आगमनाचा जिल्ह्यातील पावसावर परिणाम झाल्याचे दिसते. हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तो दुसरीकडे गेल्याने देखील पावसाचे प्रमाण घटले आहे. (प्रतिनिधी)


सर्वाधिक नोंद : ‘कुंभी’ धरण क्षेत्रात १३८ मि.मी.पाऊस
धरण क्षेत्रात पावसाचा बुधवारी जोर कमी असला तरी कुंभी धरण क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक १३८ मि.मी. पावसाची नोंद झाली.
त्या खालोखाल कोदे परिसरात ८७ मि.मी., घटप्रभा परिसरात ९१ मि.मी.,जांबरे परिसरात ९७ मि.मी., जंगमहट्टी परिसरात ७४ मि.मी., पाटगाव परिसरात ८० मि.मी., राधानगरी परिसरात ६६ मि.मी. पाऊस झाला.

‘कुंभी’वगळता इतर धरणांत जोर कमी, ‘राजाराम’ची पाणी पातळी वाढली
कुंभी कासारी धरण क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली. त्याखालोखाल राधानगरी, पाटगाव, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, कोदे या ठिकाणी पाऊस झाला. धरण क्षेत्रांतील तसेच अन्य ठिकाणच्या पाण्यामुळे नद्यांच्या पातळीतही वाढ झाली आहे. पंचगंगा नदीवरील रूई बंधाऱ्याची पाणी पातळी ३९ फूट ६ इंच झाली आहे, तर राजाराम बंधाऱ्याची पातळी दोन फुटांनी वाढून ती १० फुटांवर गेली आहे. शहरात दिवसभर पावसाचा जोर होता. गगनबावड्यासह चंदगड, राधानगरी, गडहिंग्लज, आजरा, भुदरगड तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. अन्य तालुक्यांतही रिपरिप सुरूच होती.


राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ
राधानगरी : तालुक्यातील धरणक्षेत्रात जून २०१५ च्या तुलनेत यावर्षी निम्माच पाऊस झाला आहे. मात्र, सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ होत आहे. धरणात आज दीड टी.एम.सी. पाणीसाठा झाला. काळम्मावाडी धरणातील साठा अडीच टी.एम.सी. वर गेला.तुळसी धरणात मात्र आज पाऊण टी.एम.सी. पाणी आहे. गतवर्षी आजच्या दिवसापर्यंत राधानगरी धरण क्षेत्रात १०४१ मि.मी. पाऊस होता, तर धरणात ३.११ टी.एम.सी. पाणी होते. एकूण ४८५ मि.मी. पाऊस झाला आहे. तुळसी धरण क्षेत्रात गतवर्षी आजच्या दिवशी ६५० मि.मी. पाऊस झाला होता व १.७४६ टी.एम.सी. साठा होता. आज २८ मि.मी. व एकूण २१० मि.मी. पाऊस झाला. पाणीसाठा ०.८०९ टी.एम.सी. आहे. काळम्मावाडी धरण क्षेत्रात आज ४७ मि.मी. व एकूण ३०६ मि.मी. पाऊस झाला. आज २.५९० टी.एम.सी. साठा आहे.

Web Title: Less than the previous June's rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.