किमान जे आहे ते काम तरी नीट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:21 IST2021-01-18T04:21:29+5:302021-01-18T04:21:29+5:30
कोल्हापूर : निवृत्त झाल्यानंतर सहा महिने उलटले, तरी पेन्शनचे काम होत नाही. संस्थाचालक, मुख्याध्यापकांकडून अचानक वेतन थांबविले जाते, अशा ...

किमान जे आहे ते काम तरी नीट करा
कोल्हापूर : निवृत्त झाल्यानंतर सहा महिने उलटले, तरी पेन्शनचे काम होत नाही. संस्थाचालक, मुख्याध्यापकांकडून अचानक वेतन थांबविले जाते, अशा स्वरूपातील शिक्षक, कर्मचाऱ्यांचे छोटे-छोटे अनेक प्रश्न मंत्रालयापर्यंत येतात. ते स्थानिक पातळीवर सोडविण्यात यावेत. या स्वरूपातील तक्रारींचे प्रमाण कमी व्हावे. विशेष काम नाही, पण किमान जे आहे ते काम तरी नीट करा, अशी सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी येथे शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना केली.
कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री गायकवाड यांनी शासकीय विश्रामगृहात कोल्हापुरातील शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार प्रा. जयंत आसगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार प्रमुख उपस्थित होते. शिक्षण विभागाचे अनेक प्रश्न असून त्यांची मला कल्पना आहे. ते सोडविले जातील. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात तडजोड चालणार नाही, असे मंत्री गायकवाड यांनी सांगितले.
अमन मित्तल यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची माहिती दिली. ‘सीएसआर‘ फंडासाठी स्वतंत्र खाते उघडण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत सकारात्मक कार्यवाही केली जाईल, असे मंत्री गायकवाड यांनी सांगितले.
किरण लोहार यांनी माध्यमिक शिक्षण विभागाची कामगिरी, उपक्रमांची माहिती दिली. ‘डाएट’चे प्राचार्य आय. सी. शेख यांनी थकीत वेतनाचा, तर शिक्षण सहसंचालक सुभाष चौगुले यांनी संचमान्यतेचा मुद्दा मांडला.
यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, महापालिकेच्या शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी एस. के. यादव, भरत रसाळे आदी उपस्थित होते.
चौकट
कमी पटसंख्येबद्दल नाराजी
जिल्हा परिषदेच्या मेन राजाराम हायस्कूलमधील पटसंख्या कमी होत असून ती शाळा टिकली पाहिजे, अशी मागणी आमदार आसगावकर यांनी केली. विद्यार्थ्यांना पोषण आहार, पुस्तके, गणवेश आदी आपण देतो, तरीही पटसंख्या कमी का? अशी विचारणा करत मंत्री गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली. या शाळेसाठी गणितासह काही विषयांचे शिक्षक कमी असल्याचे मित्तल यांनी सांगितले. त्यावर या शाळेतील पटसंख्या वाढीवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना मंत्री गायकवाड यांनी मित्तल यांना केली.