कोल्हापूर : सर्किट बेंचमुळे कोल्हापूर शहरातील जागा, घरांचे भाडे, हॉटेल यांची दुप्पट भाढेवाढ होणार असल्याचे मेसेज सर्वत्र व्हायरल होत आहेत. यामुळे इतर पाचही जिल्ह्यांतील नागरिकांमध्ये कोल्हापूरची प्रतिमा वेगळी बनत आहे. त्यामुळे कोल्हापूरची ही प्रतिमा जपण्यासाठी येणाऱ्या काळात रिअल इस्टेटसह, वाहतूक, हॉटेल व्यवसायामध्ये कृत्रिम भाडेवाढ करणार नाही, असा निर्धार माजी न्यायमूर्ती ॲड. तानाजी नलवडे, क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत, हॉटेल मालक संघाचे सचिन शानभाग, ब्रोकर असोसिएशनचे रत्नेश शिरोळकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
या व्यवसायात असणाऱ्या व्यावसायिकांनीही अशी भाडेवाढ करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. तानाजी नलवडे म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू होत आहे, ही कोल्हापूरकरांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. मात्र, या बेंचमुळे जमीन, फ्लॅट, ऑफिस कार्यालयाचे दर वाढल्याची एक अफवा पसरली आहे. यामुळे कोल्हापूरची प्रतिमा खराब होत आहे. हे बेंच गोरगरीब वर्गासाठी आहे. गरीब, होतकरू वकिलांसाठी आहे. गोरगरिबांना कोर्टकामासाठी मुंबईला जाणे परवडत नाही. त्यामुळे सर्किट बेंच कोल्हापुरात झाल्याचे समाधान पक्षकार व वकिलांना व्हावे, यादृष्टीने येथील सर्वच क्षेत्रांतील दर आवाक्यात असणे गरजेचे आहे.
वाचा - कोल्हापूर सर्किट बेंचसाठी १९३ जण नियुक्त, आता न्यायमूर्तींच्या नियुक्तीची प्रतीक्षा के.पी.खोत म्हणाले, सर्किट बेंचमुळे रिअल इस्टेटमध्ये कोणतीही कृत्रिम भाडेवाढ करणार नाही. सध्या चार हजारांहून अधिक घरे तयार आहेत. त्याचे दरही पूर्वीप्रमाणेच स्थिर असतील. रत्नेश शिरोळकर म्हणाले, शहराचे नाव बदनाम होऊ नये, यासाठी आचारसंहिता हवी. मार्केटमध्ये उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे कृत्रिम भाडेवाढ होणार नाही, आम्ही ती करणार नाही. यावेळी क्रिडाईचे प्रकाश देवलापूरकर, जयेश कदम, राजेश कड-देशमुख, प्रदीप भारमल, गणेश सावंत उपस्थित होते.
येणाऱ्या वकिलांसाठी मोफत सेवासर्किट बेंचच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी बाहेरून येणाऱ्या वकिलांना एक दिवसासाठी मोफत सेवा देण्यात येणार असल्याचे हॉटेलमालक संघाचे सचिन शानभाग यांनी सांगितले. कोल्हापुरातील लॉजचे दर पूर्वीपासूनच कमी आहेत. सर्किट बेंचमुळे ते वाढवले जाणार नाहीत, असेही ते म्हणाले.