वाचनालय सुरू करून जागवल्या आईच्या स्मृती!
By Admin | Updated: February 13, 2015 23:29 IST2015-02-13T23:28:45+5:302015-02-13T23:29:33+5:30
करंजिवणेच्या पाटील दाम्पत्याचा उपक्रम : वाचनसंस्कृती बळकट होण्यासाठी केला प्रयत्न

वाचनालय सुरू करून जागवल्या आईच्या स्मृती!
अनिल पाटील - मुरगूड वर्षश्राद्ध किंवा स्मृतिदिन म्हटलं की, फोटोपूजन, नैवेद्य, जेवणावळी, अशा पारंपरिक गोष्टींना फाटा देऊन करंजीवणे (ता. कागल) या डोंगरकपारीतील गावामध्ये संजय व भालचंद्र पाटील या बंधूंनी आपल्या आईच्या वर्षश्राद्धादिवशी गावामध्ये सुसज्ज वाचनालय सुरू केले. वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी करंजीवणेसारख्या ग्रामीण भागात सुरू केलेला हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे.सध्या मोबाईल, टी.व्ही., इंटरनेटच्या गराड्यात विद्यार्थी गुरफटलेला असल्याने तो वाचनसंस्कृतीपासून दूरच जात आहे. वाचनामध्ये चांगले आदर्श विचार न आल्यानेच हिंसक प्रवृत्ती बळावत आहे. म्हणूनच युवा पिढीला वाचनाकडे वळविण्यासाठी अशा उपक्रमाची समाजाला नितांत गरज आहे. ‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीचा आधार घेत आपल्या गावातील विद्यार्थ्यांना सजग करण्यासाठी कल्याण येथे सध्या इंजिनिअर असणारे संजय धोंडिराम पाटील व शिरोली एमआयडीसीमध्ये कार्यरत असणारे भालचंद्र पाटील यांनी आपल्या आई शकुंतला यांच्या स्मृतिदिनानिमित्त सुसज्ज वाचनालयाची उभारणी केली.
या वाचनालयात लहान मुलांसाठी विविध विषयांवरील छोटी छोटी पुस्तके, युवकांसाठी करिअर मार्गदर्शनपर पुस्तके, कादंबऱ्या, याशिवाय वर्तमानपत्रे उपलब्ध झाली आहेत. दिवसभर हे वाचनालय सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. या वाचनालयाचा प्रारंभही पाटील बंधूंनी प्रवचनकार डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांच्या हस्ते केला. यावेळी सरपंच सुवर्णा खाटकी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष धोंडिराम पाटील, प्रा. मीनाताई पोवार, निरंतन चकाटे, दत्तात्रय वांद्रे, शिवाजी तिप्पे, संजय पाटील, अर्जुन मसवेकर, साताप्पा आग्रे, आदी उपस्थित होते. महादेव तिप्पे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संजय आंग्रे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीनाथ खाटकी यांनी आभार मानले.