शाहू आखाड्याला अखेरची घरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:21 IST2020-12-24T04:21:17+5:302020-12-24T04:21:17+5:30
सचिन भोसले - लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : मार्केट यार्डात काम करणाऱ्या माथाडी कामगारांत व्यायामाची आवड निर्माण व्हावी व ...

शाहू आखाड्याला अखेरची घरघर
सचिन भोसले -
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : मार्केट यार्डात काम करणाऱ्या माथाडी कामगारांत व्यायामाची आवड निर्माण व्हावी व बाहेरील गरीब मल्लांना मोफत कुस्तीचे धडे मिळावेत, म्हणून कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने १९८४ साली शाहू व्यायाम आखाडा निर्माण केला. मात्र, याकडे संचालक तसेच प्रशासकांनी लक्ष न दिल्याने मोडकळीस आला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीने १९८४ साली शाहू मार्केट यार्ड येथे शाहू महाराज यांच्या स्मृती जपण्यासाठी व माथाडी कामगार, जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील गरीब मल्लांना मोफत कुस्तीचे धडे मिळावेत, त्यांची राहण्याची सोय व्हावी, या उद्देशाने शाहू व्यायाम आखाडा बांधला. खाली लाल मातीचा हौद व स्वच्छतागृह तर वरील मजल्यावर मॅटवरील कुस्तीसाठी हॉल आणि त्यावरील मजल्यावर शाहू महाराजांच्या स्मृती जपण्यासाठी गॅलरी अशी इमारत शाहू सांस्कृतिक मंदिराच्या पाठीमागे बांधली. अनेक दिग्गज मल्ल या आखाड्यात तयार झाले. आखाड्याचा नावलौकिकही झाला. मात्र, पुढे काही कारणाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवस्थापनाने या आखाड्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. त्यामुळे या त्याची दुरवस्था होऊ लागली. तेथील स्वच्छतागृहांची दारे, साहित्य कधीच निखळून पडले आहे. पावसाळ्यात सर्वत्र गळती असते. त्यामुळे भिंतीना मोठ्या चिरा पडल्या आहेत. साहित्याची वानवा आहे. विशेष म्हणजे जग मॅटवरील कुस्तीचा सराव करत आहे. मात्र, येथे कधीकाळी केलेला आखाडाच येथील मल्लांना सरावाचे साधन आहे. आखाड्यातील खिडक्यांची तावदाने फुटली आहेत; तर स्वच्छतागृहे अस्वच्छ आहेत. शासनासह समितीवर असलेल्या प्रशासकांनी वेळीच लक्ष न दिल्यास ही तालीमही नामशेष होण्यास वेळ लागणार नाही.
तालमीत येणाऱ्यांचे स्वागत अस्वच्छतेने
व्यायामासाठी केवळ मोजकेच तुटलेले डम्बेल्स आहेत; तर जीमच्या साधनांचा पत्ताच नाही. मॅट आवश्यक बाब आहे. मात्र, तिचा पत्ता नाही. मल्लांना उघड्यावर अंघोळ करावी लागते. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. तालमीत येणाऱ्यांचे स्वागत अस्वच्छतेने केले जात आहे.
इथे घडलेले दिग्गज
महाराष्ट्र केसरी बाला रफीक, महाराष्ट्र केसरी समाधान घोडके, हिंदकेसरी राकेश पटेल, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, उपमहाराष्ट्र केसरी विकास जाधव, काहीकाळ आप्पालाल शेख,
कोट
सोय नसली तरी चालेल, मात्र, काळाची गरज म्हणून येथील मल्लांना मॅटची आवश्यकता आहे. मायबाप शासन व समिती प्रशासकांनी लक्ष द्यावे.
-सादीक पटेल, वस्ताद
फोटो : २३१२२०२०-कोल-शाहू आखाडा०१
ओळी : कोल्हापुरातील शाहू मार्केट यार्डातील शाहू आखाड्याची दुरवस्थेत असलेली इमारत
फोटो : २३१२२०२०-कोल-शाहू आखाडा०२
ओळी : तालमीतील पडण्याच्या अवस्थेत असलेले छत
फोटो : २३१२२०२०-कोल-शाहू आखाडा०३
ओळी : तालमीतील मल्लांना आंघोळ करण्यासाठी उघड्यावरच स्वच्छतागृह आहे.
फोटो : २३१२२०२०-कोल-शाहू आखाडा०४
आखाडातील भिंतीना चिरा पडल्यामुळे पावसाळ्यात गळती लागली आहे.
(सर्व छायाचित्रे नसीर अत्तार)