लालपरीच्या वाहक-प्रवाशांची ‘ति’किटकिट कमी होणार!, कोल्हापूर विभागात अद्ययावत तिकीट मशीन दाखल
By सचिन भोसले | Updated: August 4, 2023 17:23 IST2023-08-04T17:23:05+5:302023-08-04T17:23:18+5:30
नव्या तिकीट मशीनमुळे वाहकांना पैसे आणि तिकीटाचा ताळमेळ एका क्लिकवर घालता येणार

लालपरीच्या वाहक-प्रवाशांची ‘ति’किटकिट कमी होणार!, कोल्हापूर विभागात अद्ययावत तिकीट मशीन दाखल
सचिन भोसले
कोल्हापूर : एस. टी. महामंडळाने कोल्हापूर विभागासाठी अद्ययावत जीपीआरएस यंत्रणेस जोडलेली १७५२ इलेक्ट्राॅनिक तिकीट इश्यू मशीन दिली आहेत. पहिल्या टप्प्यात कोल्हापूरसह संभाजीनगर आणि इचलकरंजीतील वाहकांना ती देण्यात आली आहेत. नव्या तिकीट मशीनमुळे वाहकांना पैसे आणि तिकीटाचा ताळमेळ एका क्लिकवर घालता येणार आहे.
लालपरीच्या वाहकांना यापूर्वी प्रवासादरम्यान जुन्या पद्धतीच्या एटीआयएम मशीनद्वारे प्रवाशांना तिकीट तत्काळ देताना अडचणी निर्माण होत होत्या. प्रवाशाच्या इप्सितस्थळ आले तरी या पूर्वीच्या मशीनमधून तिकीट मिळत नव्हते. त्यामुळे प्रवाशांचे तिकिटावरून वाहकाशी वाद निर्माण होत होते. अनेकदा तिकीट ट्रेचा वापर करून प्रसंगी प्रवाशांना योग्य तिकीट द्यावे लागत होते.
या त्रासासोबत अचानक तिकीट तपासणी अधिकाऱ्यांनी बसमधील प्रवाशांची तिकीटे तपासली की मशीनच्या दिरंगाईमुळे कारवाईची भीती होती. या सर्व बाबींचा विचार करून महामंडळाच्या प्रशासनाने कोल्हापूर विभागासाठी १७५२ अद्ययावत मशीन दिली आहेत. पहिल्या टप्प्यात कोल्हापूरसह संभाजीनगर, इचलकरंजी या स्थानकातील वाहकांना ती वापरण्यास देण्यात आली आहेत. अद्ययावत मशीनमुळे वाहकांना दिलासा मिळाला आहे.
एटीआयएम मशीन अशी,
हे मशीन प्रत्येक वाहकाला त्याच्या नावावर दिले जाणार आहे. त्याचे नाव, मार्ग, तिकीट दर, स्त्री, की पुरुष, अमृत योजना, पंच पास, सवलत असेल तर त्याकरीता वेगळी तरतूद, एस.टी. बस नेमकी कोठे आहे, तिकीटानुसार किती प्रवासी आहेत,ॲड्राईड बेस, नेटवर्क कनेक्टिव्हीटी, जीपीआरएसला जोडणी, अशी ही एटीआयएम मशीन आहे. संबधित वाहक कर्तव्य बजावून बाहेर पडताना हिशेबाचा ताळमेळ एका क्लिकवर मिळणार, अशी तरतूद या मशीनमध्ये आहे.
ही मशीन पहिल्या टप्प्यात कोल्हापूरसह संभाजीनगर, इचलकरंजी आगारातील वाहकांना दिली आहेत. आलेल्या मशीनमध्ये अद्ययावत डाटा भरण्याचे काम सुरू आहे. लवकरच ती उर्वरित आगारांतून वितरीत केली जातील. - अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, एस.टी.महामंडळ, कोल्हापूर