कोल्हापुरात लागली ‘लाल दिव्यां’ची आस -

By Admin | Updated: January 11, 2017 01:06 IST2017-01-11T01:02:06+5:302017-01-11T01:06:48+5:30

‘सत्ते’च्या लाटेवर ‘निष्ठावंत’ स्वार दोन्ही काँग्रेसला भाजपचा झटका - कितीजणांना देणार दिवे?

'Lal Diwana' near Kolhapur | कोल्हापुरात लागली ‘लाल दिव्यां’ची आस -

कोल्हापुरात लागली ‘लाल दिव्यां’ची आस -

राजाराम लोंढे -- कोल्हापूर -राजकारणात सत्तेला चिकटून राहण्याची सवय नवीन नाही; पण कॉँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील निष्ठावंत म्हणून ज्यांची ओळख होती, अशी मंडळीच सत्तेच्या लाटेवर स्वार झाली आहेत. यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही कॉँग्रेसला मोठा फटका बसणार असला तरी पक्षात आलेल्यांना पदे देताना भाजपची मात्र चांगलीच दमछाक होणार आहे. प्रत्येकजण लाल दिव्याची आस बाळगून भाजपमध्ये जात आहे, परंतु हा पक्ष राज्यातील सगळे लाल दिवे एकट्या कोल्हापूर जिल्ह्यालाच देणार की काय, अशी विचारणा होत आहे.
कॉँग्रेस-राष्ट्रवादी किंबहुना शिवसेना-भाजपचे सरकार असू दे, आयाराम-गयारामांची मांदियाळीच असते. सत्तेचा हात डोक्यावर असावा, असे प्रत्येकालाच वाटते. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात अशा मंडळींची संख्या काही कमी नसते. परंतु, भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून या संख्येत वाढ झाली. मूळ भाजप कार्यकर्त्यांची संख्या कमी असल्याने सत्तेचे पद लवकर पदरात पडेल, यासाठी आयारामांची संख्या वाढली असावी; पण निष्ठावंतही सत्तेच्या लाटेवर स्वार होऊ लागल्याने जिल्ह्याचे राजकारण वेगळ्या वळणावर पोहोचत आहे. महामंडळ, विविध शासकीय कमिट्यांसह जि. प. व पं.स.मध्ये संधी देण्याचे आश्वासन पक्षात येणाऱ्यांना दिले. त्याची पूर्तता करताना भाजप नेत्यांची दमछाक होणार आहे. पक्षातील गर्दी पाहता राज्यातील सगळ्या महामंडळांची पदे एकट्या कोल्हापूरला द्यावी लागतील.

तेव्हा शिवसेना..आता भाजप...
सत्तेचा करिष्माच वेगळा असतो. १९९५ ला शिवसेना-भाजपची सत्ता आल्यानंतर ‘शिवधनुष्य’ हातात घेणाऱ्यांची रिघ लागली होती. साडेचार वर्षांत दिग्गज शिवसेनेत आले; पण सत्ता गेल्यानंतर त्यांनी कधी ‘जय महाराष्ट्र’ केला, हे पक्षाच्या नेत्यांनाही समजले नाही. आताच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमक आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आक्रमकतेची जोड मिळाल्याने भाजपबद्दल कमालीचे आकर्षण आहे. सत्तेच्या लाटेवर बसण्यासाठी अनेकांनी नंबर लावले असले तरी त्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करताना भाजप नेत्यांची दमछाक होणार, हे निश्चित आहे.


निष्ठेपुढे ‘कमळ’ ‘हात’बल!
एकीकडे सत्तेत जाण्यासाठी दोन्ही कॉँग्रेसमध्ये स्पर्धा सुरू आहे. जिल्'ातील एका वजनदार नेत्यासाठी गेले दीड-दोन महिने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी फिल्डिंग लावली होती. याचा उल्लेख चंद्रकांतदादांनी अनेकवेळा केला. भाजपच्या पुण्यातील वजनदार मंत्र्याने मध्यस्थी करून मोठी आॅफरही दिली; पण या नेत्याच्या पक्षनिष्ठेपुढे भाजपचे ‘कमळ’ ‘हात’बल झाल्याची चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे.
पक्ष निष्ठावंतांचाही सन्मान अपेक्षित
सत्ता असो अथवा नसो, भाजपचे ‘कमळ’ हातात घेऊन गेली अनेक वर्षे निष्ठेने राहणारे कार्यकर्ते मात्र सत्तेच्या स्पर्धेत कोठेच दिसत नाहीत. पक्षवाढीसाठी बाहेरून येणाऱ्यांचे स्वागत निश्चितच केले पाहिजे; पण त्याबरोबर जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मानही होणे अपेक्षित आहे.

दादांची धडपड कशासाठी?
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना राज्य मंडळात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान आहे. राज्याच्या राजकारणात पकड निर्माण करण्यासाठी जिल्हा ताब्यात असणे गरजेचे आहे. त्यासाठीच महापालिका, नगरपालिकांसह साखर कारखान्यांच्या निवडणुकीत दादा ताकदीने उतरले.
यामध्ये अपेक्षित यश मिळाले. आता जिल्हा परिषद निवडणुकीत किमान २० सदस्य ‘कमळा’वर निवडून आणायचे आणि ‘जनसुराज्य’, ‘स्वाभिमानी’सह इतर मित्रपक्षांच्या मदतीने भाजपचा अध्यक्ष करण्याची खेळी दादांची आहे. त्यासाठीच त्यांनी जोडण्या सुरू केल्या आहेत.
हातकणंगले, शिरोळ टार्गेट : जिल्हा परिषदेवर सत्ता येण्यासाठी करवीर, हातकणंगले व शिरोळ तालुके निर्णायक भूमिका बजावतात. करवीरमध्ये सध्या तरी त्यांना कोणी हाताला लागलेले नाहीत. त्यामुळे हातकणंगले व शिरोळ तालुके टार्गेट केले असून, कॉँग्रेस, राष्ट्रवादीमधील अस्वस्थ नेत्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दोन्ही तालुक्यांत जिल्हा परिषदेचे १८ मतदारसंघ येतात.

Web Title: 'Lal Diwana' near Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.