भारतात ‘लक्ष्मी,’ तर नेपाळमध्ये ‘कृष्णा’ वाण
By Admin | Updated: November 23, 2015 00:04 IST2015-11-22T23:39:18+5:302015-11-23T00:04:25+5:30
तुळस दारात का लावली जाते...

भारतात ‘लक्ष्मी,’ तर नेपाळमध्ये ‘कृष्णा’ वाण
दक्षिणपूर्व आशियाई खंडात तुळशीची लागवड सर्वत्र केली जाते. त्यात हिरव्या पानांची तुळस, तर जांभळट रंगाची छटा असलेली दोन प्रकार मुख्यत्वे उत्पादित केले जातात. तुळशीला शास्त्रीय भाषेत ‘आॅशिमम टेन्युफ्लोरा’, ‘जिनोस्फोेटम टेन्युफ्लोरा’, ल्युमिनीटझोरा टेन्युफ्लोरा’, ‘मॉस्कोस्मा ट्युन्यूफ्लोरा’ आणि ‘होली बेझल’ असेही म्हणतात.
तुळशीची लागवड ही धार्मिक, औषधी उपयोगाकरीता करतात. भारतात हर्बल चहा बनविण्याकरिता तुळशीचा वापर हमखास होतो. हिंदू धर्मातील काही जातींमध्ये ‘वैष्णव’ अर्थात विष्णूला मानणारे तुळशीला महत्त्व अधिक देतात. सेंट्रल युनिर्व्हसिटी (पंजाब) भटिंडाच्या संशोधकांनी तुळस प्रथम उत्तर भारतात आढळल्याचे दाखले संशोधनादरम्यान दिले आहेत. भारतात प्रत्येकाच्या दारात तुळशीचे रोप अथवा तुळशी वृंदावन असतेच असते. तुळशीची पाने व पाणी मृत्यूनंतर माणसाच्या मुखात दिल्यास त्याला मोक्ष प्राप्ती होऊन स्वर्गात जागा मिळते, अशी अख्यायिकाही आहे. ‘ब्रह्मा वैर्वत’ पुराणात तुळस ही सीतेचं रूप मानले जाते. हिंदू धर्मामध्ये तुळसीचे दोन प्रकार आहेत.
त्यामध्ये फिक्कट हिरव्या पानांची व आकाराने मोठी तुळस ‘राम’ या नावाने, तर गडद हिरव्या रंगाची तुळस ‘हनुमान’ नावानेही ओळखली जाते. तुळशीला संस्कृतमध्ये ‘सुरस’ असेही म्हणतात. तुळशीचा रस पिल्यानंतर माणसाच्या मनातील नैराश्य दूर होते व इतर तक्रारीही निघून जातात. सुकवलेली तुळशी पावडर कापुरात मिश्रण करून सौंदर्य प्रसाधनातही वापरली जाते. थायलंड येथील थाई फुडमध्येही तुळशीचा वापर अधिक केला जातो. या ठिकाणी तुळशीला ‘कफराव’ असे म्हणतात तर तेथे तुळस घातलेला ‘लेमन राईस’ही प्रसिद्ध आहे. या डिशला ‘फटकफराव’ असेही म्हणतात. तुळसीचा वापर कीटकनाशके म्हणूनही करतात, तर श्रीलंकेमध्ये डास प्रतिबंधक म्हणूनही तुळशीचा वापर होतो. विशेषत: सिंहली भाषेत तुळशीला ‘मधूर थल्ला’ म्हणतात.
तुळशीबाई तुझा जन्म रानीवनी...
‘तुळशीला पाणी घालीन, तुळस ओवळी, पुत्र मागते सावळी उषाताई’, ‘तुळशीबाई, तुझा जन्म रानीवनी, बैस अंगणात जागा देते वृंदावनी’ अशा ओव्यांतून मौखिक परंपरेद्वारे तुळशीचे महत्त्व सांगण्यात आले आहे. पूर्वी जातं, पाणवठा यांच्याप्रमाणे तुळस हे महिलांना त्यांच्या भावनांचे विरेचन करण्याचे साधन होते. तुळशीचा आधार घेऊन महिला आपली सुख-दु:खे मांडत होत्या. तुळशीसमोर उभे राहिल्याने मनाला शांतता लाभते, अशी त्यांची भावना होती. महिला तुळशीला जिवाभावाची सखी मानत होत्या. त्यातून ओव्या, लोकगीतांच्या माध्यमातून तुळशीचे धार्मिक, वैज्ञानिक आणि पर्यावरणीय महत्त्व मांडण्यात आले आहे. यात ‘तुळशीबाई तुझा जन्म रानीवनी, बैस अंगणात जागा देते वृंदावनी’, ‘तुळशी गं माये, तुझ्या मंजुळ्या झळकती तेथे कृष्णनाथ खेळती सारीपाट’, ‘काशी काशी म्हणून लोक जाती गं धावत काशी म ’ा अंगता तुळसादेवी’, ‘तुळशी गं तुझी कातर कातर पाने येता-जाता गोविंदाने विडा नेला’, ‘तिगं माझी गं ओवी, पाहिली बाई मी तुळसीला घाली ओटा, त्यागं तुळसीचे नाव घेता बाई पाप पळलं चारी वाटा’ अशा विविध ओव्यांचा समावेश आहे. संत तुकाराम यांनी तुळशीचे महत्त्व ओव्या आणि अभंगांतून सांगितले. साने गुरुजी, दुर्गा भागवत, सरोजिनी बाबर, तारा भवाळकर, आदी लेखिकांनी आपल्या लेखनातून तुळशीचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
- डॉ. नीला जोशी,
लोकसाहित्याच्या अभ्यासक
तुळस दारात का लावली जाते...
तुळस या वनस्पतीच्या निर्मितीमागे धार्मिक आख्यायिका असली तरी प्रत्यक्षात तुळशीत अत्यंत औषधीयुक्त गुणधर्म आहेत. त्यामुळेच ही वनस्पती प्रत्येकाच्या दारात लावणे म्हणजे आरोग्यदायी जीवनाची सुरुवात. म्हणूनच सकाळी अंघोळ, देवपूजा झाली की तुळशीला पाणी घातले जाते. तुळस ही अशी एकमेव वनस्पती आहे जी दिवसा आॅक्सिजन, रात्री कार्बनडाय आॅक्साईड आणि पहाटे ओझोन वायू सोडते. या वायूच्या संपर्कात आल्याने आपण दिवसभर प्रसन्न आणि आनंदी राहतो व रोगप्रतिकारक क्षमता वाढते. आयुर्वेदानुसार तुळशीमुळे सर्दी, खोकला, ताप, त्वचारोग, मधुमेह, रक्तदाब, पोटाचे व किडनीचे विकार, कॅन्सर अशा रोगांना प्रतिबंध घालता येतो. तुळशीच्या बिया, मुळे, खोड, पाने, फुले, मंजिरी या सर्वांत औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या दारात अन्य कोणतीही वनस्पती असो वा नसो; तुळस लावलीच जाते.
का केला जातो तुलसी विवाह?
दिवाळी या प्रकाशोत्सवाचा शेवट तुळशी विवाहाने करण्याची पद्धत आहे. यादिवशी आपल्या दारात लावलेल्या तुळस या वनस्पतीचा विवाह श्रीकृष्णाशी लावला जातो. हा दिवस धार्मिक उत्सव म्हणून साजरा केला जात असला तरी त्यामागे एका पतिव्रता स्त्रीचे चारित्र्यभंग करण्याचे विदारक सत्य आहे...
जालंधर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस होता. आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधू-संतांना त्रासून सोडलेले असते. त्याला कसे रोखायचे, असा प्रश्न देवांना पडतो; अखेर ते विष्णूला शरण जाऊन जालंधरापासून सर्वांचे रक्षण करण्याची विनंती करतात. जालंधराचे खरे सामर्थ्य त्याची पत्नी वृंदा हिच्या पातिव्रत्यात असते. त्यामुळेच त्याला पराजित करायचे असेल तर वृंदेचा चारित्र्यभंग करणे गरजेचे असते. विष्णू जालंधराचे रूप घेऊन वृंदेचा चारित्र्यभंग करतात. ही घटना घडताच जालंधराचा मृत्यू होतो, नवऱ्याचे शीर पाहताच वृंदा चकीत होऊन विष्णूला तू कोण आहेस, असे विचारते आणि विष्णू खऱ्या रूपात प्रकटतात. संतप्त वृंदा विष्णूला तू दगड होऊन पडशील, मला तुझ्यामुळे पतीचा विरह सहन करावा लागला त्याप्रमाणे तुलाही पत्नीचा विरह सहन करावा लागेल, असा शाप देते आणि सती जाते.
या प्रकाराने दु:खी झालेले विष्णू तिच्या देहाची राख होते तेथेच निश्चल बसलेला असतानाच त्या राखेतून तुळस ही वनस्पती उगवते. ही तुळस वृंदेच्या नावावरून जेथे लावली जाते त्याला ‘वृंदावन’ म्हणतात. देव दगड होऊन पडला त्यालाच ‘शाळिग्राम’ म्हणतात आणि पुढे राम अवतारात विष्णूला पत्नीचा विरह सहन करावा लागला. वृंदेच्या मृत्यूच्या घटनेपासून विष्णूला तुळस अत्यंत प्रिय झाली म्हणून तुळशीचे लग्न शाळिग्राम किंवा श्रीकृष्णाशी लावले जाते.