हातकणंगलेत लसीच्या तुटवड्यामुळे गाेंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:23 IST2021-05-12T04:23:31+5:302021-05-12T04:23:31+5:30
हातकणंगले : तालुक्यातील ४५ वर्षांवरील २ लाख ३९ हजार व्यक्तींपैकी १ लाख ५४ हजार व्यक्तींनी कोरोना व्हॅक्सिनचा पहिला डोस ...

हातकणंगलेत लसीच्या तुटवड्यामुळे गाेंधळ
हातकणंगले : तालुक्यातील ४५ वर्षांवरील २ लाख ३९ हजार व्यक्तींपैकी १ लाख ५४ हजार व्यक्तींनी कोरोना व्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे. अद्याप ८४ हजार व्यक्तींना कोरोना लस मिळालेली नाही. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयासमोर पहाटेपासूनच लस घेण्यासाठी रांगा लागल्या आहेत. तालुका आरोग्य यंत्रणेकडे कोरोना लसीच्या फक्त १९ व्हायल उपलब्ध आहेत. लसीच्या तुटवड्यामुळे वादावादीचे आणि गोंधळाचे प्रमाण वाढले आहे.
तालुक्यामध्ये ९ प्राथमिक आरोग्य केंद्र, २ उपकेंद्र, २ ग्रामीण रुग्णालये, इचलकरंजी नगर परिषद आरोग्य यंत्रणा आणि पेठवडगाव नगरपालिका आरोग्य विभागाकडून ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लस देण्याचा उपक्रम सुरू आहे. ९ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २ उपकेंद्रामार्फत १० मे अखेर आरोग्य कर्मचारी, सरकारी कर्मचारी आणि ४५ वर्षांवरील ९०९४८ व्यक्तींना पाहिला डोस तर १६४७७ व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला आहे. हातकणंगले ग्रामीण रुग्णालयाच्या केंद्रावरून ५८५२ व्यक्तींना पहिला डोस तर १३८९ व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला आहे. पारगाव ग्रामीण रुग्णालय केंद्रावरून ४६४४ व्यक्तींना पहिला डोस तर ७१३ व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला आहे. पेठवडगाव नगरपालिका आरोग्य यंत्रणेने ४१८७ व्यक्तींना पहिला डोस तर १६७४ व्यक्तींना दुसरा डोस दिला आहे. इचलकरंजी नगर परिषद आरोग्य यंत्रणेने ४५३५१ व्यक्तींना पहिला डोस तर १३४०९ व्यक्तींना दुसरा डोस आतापर्यंत दिलेला आहे. लसीच्या तुटवड्यामुळे तालुक्यातील ८४१११ व्यक्ती लस घेण्यापासून वंचित राहिल्या असून, लस देणाऱ्या सर्वच केंद्रांवर पहाटेपासून रांगा लागल्या आहेत. आरोग्य यंत्रणा हतबल झाली असून, लसीच्या तुटवड्यामुळे लस केंद्राबाहेर गोंधळ आणि वादावादीचे प्रसंग घडत आहेत.
तालुक्यामध्ये १ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील ३ लाख ८६ च्या वर व्यक्तींना कोरोना लस देण्याची शासनाची योजना पूर्णत: फसली आहे. १ मे पासून १० मे पर्यंतच्या १० दिवसात नोंदणी झालेल्या १८ वर्षांवरील फक्त ९५६ व्यक्तींना हातकणंगले ग्रामीण रुग्णालय केंद्रावरून लस देण्यात आली आहे. अद्याप ३ लाख ८५ हजार व्यक्ती लसीच्या प्रतीक्षेत आहेत.