कुरूंदवाडच्या संस्थानकालीन कुस्ती परंपरेला घरघर

By Admin | Updated: May 23, 2015 00:28 IST2015-05-22T23:37:24+5:302015-05-23T00:28:24+5:30

गतवैभव मिळवून देण्याची गरज : एकेकाळी कुस्तीच्या माध्यमातून कुरूंदवाडचा संपूर्ण देशात होता दबदबा

Kurundwad's Institutional Wrestling Program | कुरूंदवाडच्या संस्थानकालीन कुस्ती परंपरेला घरघर

कुरूंदवाडच्या संस्थानकालीन कुस्ती परंपरेला घरघर

गणपती कोळी - कुरुंदवाड -कुरुंदवाड शहराला क्रीडा परंपरा आहे. सर्वच भारतीय खेळात आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत चमकदार कामगिरी करणारे खेळाडू या शहरात आहेत. मात्र एकेकाळी कुस्तीच्या माध्यमातून संपूर्ण देशात दबदबा निर्माण करणाऱ्या या शहरातील कुस्तीलाच घरघर लागली आहे. त्यामुळे इतर खेळाबरोबरच कुस्तीलाही पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे.
संस्थान काळात पटवर्धन सरकारांनी कला, क्रीडा व सांस्कृतिक वारसा जतन करण्याबरोबरच कुस्ती किंवा मल्लयुद्धालाही त्यांनी प्रामुख्याने प्राधान्य दिले. त्यासाठी त्यांनी आपल्या दरबारी नावाजलेले पै. धाकटा मिरा (पंजाब), पै. थोरला मिरा (पंजाब), पै. आण्णाप्पा बंदिवान वस्ताद, पै. गुलाम कादर (पंजाबी) आदींना आश्रित ठेवले. त्यांचा संपूर्ण खुराक, पाणी व्यवस्था संस्थानच्यावतीने केला जात असे.
यात्रा, गणेशोत्सव विविध सणांच्या निमित्ताने कुस्त्यांचे मैदान भरवून देशभरातील पैलवान, मल्लांना निमंत्रित करून जंगी कुस्त्यांचे आयोजन करत. कुस्तीला राजाश्रय मिळाल्याने घराघरांत मल्ल तयार होत. या मल्लांना सराव व प्रशिक्षणासाठी शहरात विविध विभागात मातीतील १० तालीम होत्या. संस्थानिक खालसा झाली तरी पैलवानांचा राजाश्रयही लुप्त होत गेला. त्यामुळे कुस्ती कमी होत तालमीही लोप पावत गेल्या.
संस्थानिकांनंतर वस्ताद दादू बंदिवान, जनार्दन आंबी, सत्याप्पा महावळे, बापू बंदिवान, महम्मद पाथरवट, गुंडू बागडी, आदींनी आपल्या परीने तर प्रत्येक वर्षी यात्रा समितीच्या माध्यमातून भाऊसाहेब सावगावे, धनपाल आलासे, मकबूल बारगीर, बाळू झारी, रामा पाथरवट यांनी कुस्ती जोपासण्याचा प्रयत्न केला. या नगरीला कुस्ती परंपरेचा मोठा इतिहास असतानाही म्हणावा तसा विकास झाला नाही. खुराक, पाण्याची कमतरता, आर्थिक पाठबळ नाही, समाजात कुस्तीबाबत असलेली अनास्था आणि टीव्ही वाहिन्यांचे मनोरंजन, संगणक युग यामुळे तालमीबरोबरच कुस्तीही ओस पडू लागली आहे. उज्ज्वल क्रीडा परंपरा असलेल्या या शहरात कुस्तीला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे.

शहराला वैभवशाली कुस्ती परंपरा आहे. मात्र, विविध टीव्ही चॅनल्स, कॉम्प्युटर, मोबार्ईल यामुळे कुस्ती तरुणांपासून लांब जात असून, याचा त्यांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होत आहे. आधुनिक पिढीला तंदुरुस्त करण्यासाठी पालकांनीही मुलांना कुस्तीबाबत जागरूक करणे गरजेचे आहे. तसेच कुस्ती परंपरा, संस्थानकालीन तालीम जपण्यासाठी विविध विकास संस्था, सेवाभावी संस्था, मंडळे, क्रीडाशौकीनांनी पुढाकार घेऊन तरुणांमध्ये, पालकांमध्ये जागृती करून मल्लांच्या खर्चाचे नियोजन केल्यास पुन्हा नक्कीच शहराच्या कुस्ती परंपरेला उर्जितावस्था लाभेल.
- प्रा. बी. डी. सावगावे, कुरुंदवाड, क्रीडा मार्गदर्शक


शहराला कुस्ती परंपरा असल्यामुळे एस. के. पाटील कुस्ती केंद्र, कुडेखान तालीम मंडल, साधना कुस्ती केंद्र या ठिकाणी कुस्तीचा सराव केला जातो.
आधुनिक कुस्ती गादीवर खेळली जात असल्याने एस. के. पाटील कुस्ती केंद्राने आधुनिक पद्धतीची मॅट सरावाकरिता उपलब्ध करून दिली आहे.
या केंद्रातून जवळपास ३० ते ४० लहान, मोठे मल्ल सराव करीत असून, अक्षय देवळेकर यासारखे छोटे मल्ल आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत उपलब्ध साधनांचा उपयोग करत चमक दाखवत आहेत.

Web Title: Kurundwad's Institutional Wrestling Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.