कुंभोजात महाविकास आघाडीची सत्ता दृष्टिक्षेपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:25 IST2021-01-23T04:25:00+5:302021-01-23T04:25:00+5:30
कुंभोज : कुंभोज (ता.हातकणंगले) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत दोन्ही आघाड्यांपाठोपाठ अपक्षांनाही अनपेक्षित यश मिळाले. महाविकास आघाडी दोन अपक्षांसह १० संख्याबळावर ...

कुंभोजात महाविकास आघाडीची सत्ता दृष्टिक्षेपात
कुंभोज : कुंभोज (ता.हातकणंगले) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत दोन्ही आघाड्यांपाठोपाठ अपक्षांनाही अनपेक्षित यश मिळाले. महाविकास आघाडी दोन अपक्षांसह १० संख्याबळावर सत्तास्थापनेसाठी सरसावत असताना आघाडीच्या बिनविरोध जागेवर विरोधी लोकविकास आघाडीने दावा सांगितला. तथापि, बिनविरोध महिला उमेदवाराने महाविकास आघाडी सोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने सद्यस्थितीत ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीची सत्ता येण्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे.
दरम्यान लोकविकास आघाडीचेही पुरेशा बहुमतासाठी अद्याप प्रयत्न सुरू आहेत.
काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आर.पी.आय. प्रणित महाविकास आघाडीस सात, जनसुराज्य शक्ती पक्ष तसेच भाजप प्रणित लोकविकास आघाडीस ४ तर अपक्ष ५ जागांवर विजयी झाले.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या बिनविरोध जागेवर लोकविकास आघाडीने हक्क सांगत दोन अपक्षांना सोबत घेऊन आणखी दोघा अपक्षांना आघाडीत खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने महाविकासच्या सत्तास्थापनेचे गणित बिघडण्याचे संकेत दिसू लागले होते. तशा चर्चा व घडामोडींनी वेग घेतला होता.
तथापि बिनविरोध महिला उमेदवाराने महाविकास आघाडीसोबतच राहण्याचा निर्णय घेतला असल्याने लोकविकास आघाडीचे सत्तास्थापनेचे गणित आता कसे जुळणार, याबाबत नागरिकांत तर्कवितर्क लढवले जात आहेत; मात्र लोकविकास आघाडीने सत्ता स्थापनेचे प्रयत्न अद्यापही थांबविले नसल्याचे एकूण घडामोडींवरून दिसून येत आहे.