संसर्ग रोखण्यासाठी कर्नाटकचा कुडची पॅटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 04:18 AM2020-04-29T04:18:13+5:302020-04-29T04:18:24+5:30

अत्यावश्यक सेवा घरपोहोच आदींच्या माध्यमातून कुडची नगरपालिका आणि ग्रामपंचायतीने आपले स्वत:चे मॉडेलच विकसित केले आहे.

Kudchi pattern of Karnataka to prevent infection | संसर्ग रोखण्यासाठी कर्नाटकचा कुडची पॅटर्न

संसर्ग रोखण्यासाठी कर्नाटकचा कुडची पॅटर्न

Next

चंद्रकांत कित्तुरे
कोल्हापूर : कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात भिलवाडा पॅटर्नचा बोलबाला असला, तरी बेळगाव जिल्ह्यातील कुडची हे शहर ज्या पद्धतीने कोरोनाशी लढा देत आहे. तो कर्नाटकात कुडची पॅटर्न म्हणून लोकप्रिय होत आहे; यासाठी शहरातील रस्त्यांसह सर्व घरांचे आतून बाहेरून सॅनिटाईझिंग, शहरवासीयांचे तीनवेळा थर्मल टेस्टिंग, तसेच बाहेरच्या माणसांना प्रवेशबंदी, शंभर टक्के लॉकडाऊन, अत्यावश्यक सेवा घरपोहोच आदींच्या माध्यमातून कुडची नगरपालिका आणि ग्रामपंचायतीने आपले स्वत:चे मॉडेलच विकसित केले आहे.
या मॉडेलच्या आधारेच कोरोनाचे १९ रुग्ण सापडून देखील त्याचे समाजात संक्रमण होण्यापासून रोखण्यात शहराने यश मिळविले आहे. नगरपंचायत, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाने हातात हात घालून काम केल्यानेच हे साध्य झाले आहे.
सांगलीपासून रस्त्याने ४९ आणि रेल्वेने ४० किलोमीटरवर कृष्णा नदीकाठी कुडची हे शहर वसलेले आहे. लोकसंख्या सुमारे ५५ हजार लोकसंख्या आणि मुस्लीमबहुल असलेले हे शहररेल्वे मार्गाने जोडलेले असल्यामुळे महाराष्टÑातील मिरज, सांगलीसह अन्य शहरांशीही कुडचीवासीयांचा नित्य संपर्क येत असतो. फेब्रुवारीत दिल्लीत झालेल्या तबलिगीच्या मरकजला कुडचीतीलही पंधराजण गेले होते. हे समजताच त्यांना एक एप्रिलला संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले. यातील चौघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल ६ फेब्रुवारी रोजी आला. यामुळे शहरात भीतीची छाया पसरली. नगरपंचायत, ग्रामपंचायतीने तातडीने बैठक घेऊन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काय करता येईल, याबाबत विचारविनिमय करुन निर्णय घेण्यात आले. उपाययोजना चालू झाल्या. दरम्यान ज्या चौघांना कोरोना झाला होता. त्या दोन कुटुंबीयांशी संबंधित लोकांनाही त्याची लागण होऊ लागली. हा आकडा आजअखेर १९ वर गेला आहे. यातील चौघेजण आता कोरोनामुक्त झाले आहेत. उर्वरितांची प्रकृतीही सुधारत आहे.
घरपोहोच सेवा
शहर १00 टक्के बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याच्या अंमलबजावणीसाठी तरुण स्वयंसेवकांच्या तुकड्या तयार करण्यात आल्या. शहरात २३ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागात नगरसेवकाच्या नेतृत्वाखाली १० तरुणांची फौज देण्यात आली. शहरातील दुकानदारांचे तसेच या तरुणांचे मोबाईल नंबर प्रत्येक कुटुंबाला देण्यात आले. जे हवे ते त्यांनी दुकानदार अथवा स्वयंसेवकांना सांगायचे. त्यांनी काही तासांतच ते घरपोहोच करायचे, अशी पद्धत चालू करण्यात आली; त्यामुळे सामाजिक संसर्ग टाळण्यात यश आले.
गरिबांना मोफत दूध
गरीब कुटुंबांना शासनाने मोफत तांदूळ, गहू तर दिलेच; पण कर्नाटक सरकारने या कुटुंबांना दररोज एक लिटर दूध घरपोहोच देण्याची योजना सुरू केली. या योजनेचा फायदाही नागरिकांना झाला आहे.
पंधराशेहून अधिक जणांचे स्वॅब
शहरातील कोरोनाची लक्षणे आढळलेले तसेच बाधितांच्या संपर्कातील दीड हजाराहून अधिक जणांचे स्वॅब घेऊन त्याची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सर्व नागरिकांची चाचणी करण्यासाठी सध्या दररोज ३०० हून अधिक जणांचे स्वॅब घेण्यात येत आहेत.
नगरपालिका अन् ग्रामपंचायतही
कुडची याच नावाची नगरपालिका आणि ग्रामपंचायत एकाच ठिकाणी कशी? असा प्रश्न कोणालाही पडेल. पण हे खरे आहे.कुडची शहरालगतच्या सुमारे १० किलीमीटरचा परिघ कुडची ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीत ४१ सदस्य आहेत.
> एकच प्रवेश मार्ग
कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर सुरुवातीला लॉकडाऊन होतेच; पण कोरोना रुग्णाच्या कुटुंबीयांनाही त्याचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट होताच १६ एप्रिलपासून त्याची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली. शहरात येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले. कर्नाटक सर्कल या चौकातूनच फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच प्रवेश देण्यात येत आहे.
>तीनदा थर्मल टेस्ट
शहरात रुग्ण आढळल्यापासून घराघरांत जाऊन प्रत्येकाची तीनवेळा थर्मल टेस्ट करण्यात आली आहे. संस्थात्मक क्वारंटाईनसाठी शाळा, लॉजचा वापर करण्यात आला.
>नगरपंचायत, ग्रामपंचायत, प्रशासन आणि आरोग्य विभागाने एकत्रितपणे काम केल्याने शहरात कोरोनाचा संसर्ग टाळण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.
- दत्ता सन्नके, नगरसेवक, भाजप
घरपोहोच सेवा दिल्या. भाजीपाला, फळविक्रेत्यांना पास दिले. सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले. रमजान सुरू असल्याने विक्रेत्यांना सर्व नियम पाळून घरोघरी जाऊन भाजीपाला, फळे विक्रीला परवानगी दिली आहे. संसर्ग २ कुटुंबापुरताच मर्यादित राखण्यात यश आले आहे.
- हमिद रोहिले, नगरसेवक, कॉँग्रेस

 

Web Title: Kudchi pattern of Karnataka to prevent infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.