‘केएसए’ जिल्हा संघाची धुळे संघावर मात

By Admin | Updated: January 29, 2015 00:11 IST2015-01-28T23:57:13+5:302015-01-29T00:11:29+5:30

आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप

KSA District Team defeats Dhule team | ‘केएसए’ जिल्हा संघाची धुळे संघावर मात

‘केएसए’ जिल्हा संघाची धुळे संघावर मात

कोल्हापूर : धुळे येथे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये आज, बुधवारी कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या जिल्हा संघाने धुळे जिल्हा संघावर ४-० अशी मात केली.
सामन्याच्या प्रारंभापासून ‘केएसए’ संघाने धुळे संघावर वर्चस्व निर्माण केले होते. पूर्वार्धात ३० व्या व
३२ व्या मिनिटास केएसएच्या आकाश भोसलेने रोहित कुरणेच्या पासवर गोल नोंदवीत २-० अशी आघाडी निर्माण केली होती.
धुळे संघाने आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यात यश मिळाले नाही . उत्तरार्धातही केएसए संघाने आक्रमक खेळावरच भर दिला. त्यांच्या सुमित घाडगेने ५० व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदविला. तर सामन्याच्या ६९ व्या मिनिटास रोहित पाटील याने मैदानी गोल नोंदवीत संघाची आघाडी ४-० अशी भक्कम निर्माण केली. यामुळे धुळे संघावर मोठा दबाव आला. सामन्याच्या निर्धारित वेळेत हीच आघाडी कायम राखत केएसए जिल्हा संघाने हा सामना ४-० अशा गोलफरकाने जिंकला.
सामन्यात केएसएकडून शकील पटेल, अमृत हांडे, श्रेयस मोरे, माणिक पाटील, कपिल साठे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या संघास प्रा. अमर सासने, राजेंद्र चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: KSA District Team defeats Dhule team