कृष्णा योजनेच्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:23 IST2021-03-24T04:23:29+5:302021-03-24T04:23:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहराला कृष्णा योजनेतून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला मोठी गळती लागली. त्यामुळे त्यातून सुमारे ...

कृष्णा योजनेच्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह फुटला
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहराला कृष्णा योजनेतून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला मोठी गळती लागली. त्यामुळे त्यातून सुमारे २५ फूट उंच पाण्याचा फवारा उडत होता. टाकवडे वेस परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. याची माहिती मिळताच नगरपालिका प्रशासनाने कृष्णा नदीतून पाणी उपसा बंद केला. त्यानंतर तातडीने व्हॉल्व्ह दुरुस्तीला सुरुवात केली.
कृष्णा नदीतून मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील उपसा केंद्रातून जलवाहिनीने इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा होतो. टाकवडे वेस परिसरात या पाईपलाईनच्या व्हॉल्व्हशी कोणीतरी छेडछाड केली. त्यानंतर व्हॉल्व्ह मोडला. यातून सुमारे २० ते २५ फूट पाण्याचा फवारा उडत होता. बराच वेळ हा फवारा सुरू होता. मुख्य मार्गालगतच हा प्रकार घडल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये याचे चित्रीकरण केले. या गळतीमुळे आसपासच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पालिका प्रशासनाने तातडीने व्हॉल्व्ह दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली असून, रात्री दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी उपसा सुरू होणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यात एक दिवसाचा खंड पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
फोटो ओळी
२३०३२०२१-आयसीएच-०३
कृष्णा योजनेतून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या टाकवडे वेस परिसरात जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला मोठी गळती लागली.