कोल्हापूरच्या ‘स्वीप’ प्रकल्पाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव होणार
By Admin | Updated: September 7, 2014 00:58 IST2014-09-07T00:57:48+5:302014-09-07T00:58:42+5:30
१९ सप्टेंबरला नवी दिल्ली येथे पुरस्काराचे वितरण

कोल्हापूरच्या ‘स्वीप’ प्रकल्पाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव होणार
कोल्हापूर : मतदार जागृती अभियान उत्कृष्टरीत्या राबवून लोकशाही बळकटीकरणाच्या प्रक्रियेत लक्षणीय सहभाग नोंदविल्याबद्दल जिल्हा निवडणूक विभागाच्या ‘सिस्टेमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अॅँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन (स्वीप)’ या प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावरील ‘स्कॉच अवॉर्ड फॉर एक्सलन्स-२०१४’ स्पर्धेमध्ये ‘स्कॉच आॅर्डर आॅफ मेरिट’ हा बहुमान मिळाला आहे. १९ व २० सप्टेंबरला नवी दिल्ली येथे समारंभपूर्वक पुरस्काराचे वितरण होणार आहे.
जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व निवडणूक यंत्रणेने लोकसभा निवडणुकीत उत्कृष्ट कार्य केले. त्याची पोचपावती या पुरस्काराच्या रूपाने मिळाली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी माने यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’ ही मोहीम गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदारांची नोंदणी झाली. तसेच गत लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदान केले. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढून राज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाले. या पार्श्वभूमीवर ‘स्कॉच अवॉर्ड फॉर एक्सलन्स-२०१४’ स्पर्धेमध्ये जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी माने यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’ या विषयावर सहभाग घेण्यात आला होता. ‘स्कॉच’ निवड समितीकडून या प्रकल्पाची द बेस्ट प्रोजेक्ट इन द कंट्री म्हणून निवड करण्यात आली असून, या प्रकल्पाला ‘स्कॉच आॅर्डर आॅफ मेरिट’ हा बहुमान प्राप्त झाला. (प्रतिनिधी)