निगर्वी, मनमिळाउ आशालता यांच्याशी कोल्हापूरचा घरोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 08:05 PM2020-09-22T20:05:58+5:302020-09-22T20:07:38+5:30

मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान कोरोनामुळे बाधित झालेल्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आशालता वाबगांवकर यांच्या मृत्यूमुळे त्यांच्यासोबत काम केलेल्या आणि त्यांच्याशी घनिष्ठ नाते असलेले कोल्हापूरकर हळहळले, गहिवरले. निगर्वी, मनमिळावू आणि प्रतिभावंत कलावंत असलेल्या आशाताईच्या आठवणींना अनेकांनी उजाळा दिला.

Kolhapur's home with a humble, agreeable Ashalta | निगर्वी, मनमिळाउ आशालता यांच्याशी कोल्हापूरचा घरोबा

दिवंगत दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या लेक लाडकी या चित्रपटादरम्यान आशालता वाबगावकर यांच्यासोबत भालकर, त्यांचे चिरंजीव संग्राम व इतर.

Next
ठळक मुद्देनिगर्वी, मनमिळाउ आशालता यांच्याशी कोल्हापूरचा घरोबाप्रतिभावंत कलावंताच्या जाण्याने गहिवरले कोल्हापूरकर

कोल्हापूर : मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान कोरोनामुळे बाधित झालेल्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आशालता वाबगांवकर यांच्या मृत्यूमुळे त्यांच्यासोबत काम केलेल्या आणि त्यांच्याशी घनिष्ठ नाते असलेले कोल्हापूरकर हळहळले, गहिवरले. निगर्वी, मनमिळावू आणि प्रतिभावंत कलावंत असलेल्या आशाताईच्या आठवणींना अनेकांनी उजाळा दिला.

ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांच्या सूत्रधार या हिंदी चित्रपटात आशालता यांनी प्रमुख भूमिका केली. या चित्रपटासोबत जोशी यांनी आशालतांच्या गाण्याची एक आठवण सांगितली. बा. भ. बोरकर, आशालता आणि स्वत: जोशी गोव्यात मांडवी किनारी बसलेले असताना आशालतांनी मत्स्यगंधेनी गर्द सभोती हे गाणे गायिले आणि मग एकामागून एक पहाटेपर्यंत गाणी गात गेल्याची आठवण सांगितली. गीतेचा १५ वा आणि १८ वा अध्याय कोंकणीतून समवृत्तात ऐकण्याचे भाग्य लाभले आणि आयुष्यभर पुरणारा ठेवा मिळाल्याचे जोशी म्हणाले.

सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करताना पन्हाळ्यावरील सूत्रधारच्या चित्रीकरणादरम्यानची आठवण मला भेटलेली मोठी माणसं या पुस्तकात ज्येष्ठ दिवंगत दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी लिहून ठेवली आहे. मायेची सावली, सूत्रधार, लेक लाडकी या सिनेमाच्या निमित्ताने आशालता यांच्याशी स्नेह जुळल्याचे भालकर त्यांनी नमूद केले आहे.

लेक लाडकीसाठी त्यांनी सलग तारखा तर दिल्याच पण मानधनाचा विचार न करता करारपत्र केल्याची आठवण भालकरांनी लिहिली आहे. डबिंगच्या मुहूर्तावेळी मोठ्या पावसात भिजूनही क्लायमॅक्सचा संवाद एका दमात म्हटल्याचे त्यांनी लिहिले आहे. कोल्हापूरात त्या प्रत्यक्ष आल्या तेव्हा आठवणींनी घरी भेट घेतल्याचे आणि भेटवस्तू आणल्याची आठवण पुस्तकात असल्याचे भालकर यांचे चिरंजीव संग्राम यांनी सांगितले.

भालचंद्र कुलकर्णी यांनी त्यांच्यासोबत तीन ते चार मराठी चित्रपटात काम केले आहे. माहेरची साडी, वहिनीची माया, सूत्रधार या चित्रपटादरम्यान त्यांच्या स्वभावाची प्रचीती आल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. अभिनयाची जाण असणाऱ्या कलाकार आज हयात नाहीत, याबद्दल वाईट वाटते असे ते म्हणाले.

लेक लाडकी चित्रपटाच्या कोकणात देवगड येथील चित्रिकरणादरम्यान गोव्याच्या बाजूला असणाऱ्या आपल्या गावातून आशालता कलाकारांसाठी घरुन मासे घेउन येत असल्याची आठवण त्यांचे सहकलाकार इम्तियाज बारगीर यांनी सांगितली.

जगज्जननी श्री महालक्ष्मी चित्रपटादरम्यान चंद्रकांत जोशी यांच्यासोबत मुंबईत शिवसेनाभवनासमोर आशालता भेटल्या आणि सुमापे पाउणतास हसतखेळत गप्पा मारल्याची आणि या चित्रपटात आपल्यालाही रोल हवा, असा प्रेमळ दम दिल्याची आठवण उमेश नेरकर यांनी सांगितली आहे.

मत्स्यगंधा नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची आठवण

ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी आशालता यांच्यासोबतच्या दोन आठवणी सांगितल्या. मराठी-कोंकणी वादाची पार्श्वभूमी असताना १९६४ मध्ये गोव्यात कुसुमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मत्स्यगंधा नाटकाचा पहिला प्रयोग पाहण्याचे भाग्य लाभल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

 

Web Title: Kolhapur's home with a humble, agreeable Ashalta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.