कोल्हापूरच्या ‘फुटबॉलची दशा आणि दिशा’
By Admin | Updated: May 5, 2017 22:55 IST2017-05-05T22:41:54+5:302017-05-05T22:55:29+5:30
यंदा फुटबॉल हंगाम गुंडाळल्याचीच भावना रसिकांमध्ये झाली आहे. -

कोल्हापूरच्या ‘फुटबॉलची दशा आणि दिशा’
कोल्हापूर : एका बाजूला भारत जागतिक फुटबॉल क्र्रमवारीत १०० व्या क्रमांकाच्या आत आला आहे. या पार्श्वभूमीवर ओतपोत फुटबॉलचे चाहते असलेल्या कोल्हापुरात मात्र, फुटबॉल स्पर्धा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. फुटबॉलला दिशा देणारे आणि दशा करणारे यांच्यातील जित कोणाची होती ते आता काळच ठरविणार आहे. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनची वरिष्ठ संस्था म्हणून वेस्टर्न इंडिया फुटबॉल व भारतीय फुटबॉल फेडरेशन १२ ते १९ वर्षांखालील मुला-मुलींसाठी गेल्या वर्षभरात पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षण देत आहेत. या कार्यक्रमातूनच भारतीय युवा संघाला कोल्हापूरातून एक अनिकेत जाधव नावाचा हिरा सापडला. हे जरी खरे असले तरी कोल्हापूरचा फुटबॉल दिवसें-दिवस या ना त्या कारणाने बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यात कधी काही संघांच्या समर्थकांची हुल्लडबाजी, तर कधी खेळाडूंच्यामध्ये हाणामारी ही कारणे तर हमखास ठरलेली होती. यंदा मात्र, या सर्व कारणांना मागे टाकत अवैधरित्या खेळाडूंची नोंदणी, हे कारण पुढे आणि दोन संघ विरुद्ध अकरा संघ अशी उघड-उघड फूट पडली. त्यातून ११ संघांनी नेताजी चषक स्पर्धेनंतर पुढील होणाऱ्या अस्मिता चषक स्पर्धेतच न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या संघात समेट करण्यासाठी के.एस.ए. ने पाऊल उचललेही पण अंतर्गत राजकारणामुळे फुटबॉल स्पर्धांची तारीख काही केल्या फुटबॉल शौकिनांना कळलीच नाही. या वादामुळे संपूर्ण फुटबॉल हंगाम केवळ तीन स्पर्धांमध्येच संपल्याची चर्चा आता पेठां-पेठांमध्ये रंगू लागली आहे. फुटबॉल खेळाला संस्थानकाळापासून राजाश्रय आहे. त्यामुळे कोलकाता, गोवा या ‘फुटबॉलच्या पंढरी’नंतर महाराष्ट्रातील कोल्हापूरचे नाव ‘तिसरी फुटबॉल पंढरी’ म्हणून आवर्जून घेतले जाते तरीही कोल्हापुरात शालेय स्पर्धा सोडल्यास यंदा वरिष्ठ गटातील फुटबॉल स्पर्धा झाल्याच नाहीत. त्यामुळे यंदा फुटबॉल हंगाम गुंडाळल्याचीच भावना रसिकांमध्ये झाली आहे. -
के.एस.ए. चषक, महाकाली चषक, दसरा चषक, नेताजी चषक, महापौर चषक, मुस्लिम बोर्डिंग चषक, छत्रपती शहाजी चषक, खंडोबा चषक, लोकमत केपीएल, खंडोबा चषक, अवधूत घारगे चषक, टेरियर चषक असा भरगच्च फुटबॉल हंगाम कधीकाळी फुटबॉलरसिकांना अनुभवता व पाहता आला. यंदा मात्र, केवळ चारच स्पर्धा पार पडल्या. त्यात के.एस.ए.लीग, महापौर चषक, नेताजी चषक आणि सैन्यदलातील विविध विभागांच्या स्पर्धा झाल्या.
भारत प्रथमच १०० च्या आत शुक्रवारी ‘फिफा’ची जागतिक क्रमवारी जाहीर झाली त्यात भारताने पहिल्या १०० मध्ये क्रमांक पटकाविला आहे. विशेष म्हणजे आपला भारतीय संघाने १३४ व्या स्थानावरून १०० व्या क्रमवारीपर्यंतच मजल मारली आहे. त्यातही सुधारणा होत भारतीय फुटबॉल येत्या काही दिवसांत दोन अंकी संख्येच्या क्रमवारीत येण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याला ग्रास रूट अर्थात पायाभूत फुटबॉलकडे लक्ष दिल्याची भावना फुटबॉलशौकीन व ज्येष्ठ फुटबॉलपटूंना वाटत आहे. --------- प्रतिक्रीया आयलीग, केसीएल या स्पर्धांमध्ये जगातील नामवंत फुटबॉलपटू भारतात येऊन खेळू लागल्याने भारतीय फुटबॉलचा दर्जा सुधारल्याचे चिन्हे आहेत. त्यात ग्रास रूटकडे भारतीय फुटबॉल फेडरेशन गांभीर्याने पाहत आहे. विशेषत: यंदा भारतात युवा विश्वचषक होत आहे. येत्या काळात भारतही जागतिक क्रमवारीत तीन अंकी संख्येवरून दोन अंकी संख्येवर येईल.
- शिवाजी पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते फुटबॉलपटू व मार्गदर्शक
जागतिक क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या शंभरमध्ये आला आहे; पण ‘फुटबॉलची पंढरी’ म्हणून समजल्या जाणाऱ्या कोल्हापूरचा फुटबॉल बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे फुटबॉल संघ, खेळाडू आणि समर्थकांनी चिंतन करण्यासारखा आहे. बंद पडू पाहत असलेला कोल्हापुरी फुटबॉल सुरू व्हावा. - अनिल धडाम, फुटबॉल रसिक