कोल्हापूरकर रविवारी जल्लोषात धावले ; ‘लोकमत महामॅरेथॉन’ला मिळाला कमालीचा प्रतिसाद

By संदीप आडनाईक | Published: January 28, 2024 12:46 PM2024-01-28T12:46:36+5:302024-01-28T12:47:07+5:30

रविवारची पहाट कोल्हापूरकरांसाठी जोश, सळसळता उत्साह घेऊन आली

Kolhapurkar ran in jubilation on Sunday morning; Great response to 'Lokmat Mahamarathon' | कोल्हापूरकर रविवारी जल्लोषात धावले ; ‘लोकमत महामॅरेथॉन’ला मिळाला कमालीचा प्रतिसाद

कोल्हापूरकर रविवारी जल्लोषात धावले ; ‘लोकमत महामॅरेथॉन’ला मिळाला कमालीचा प्रतिसाद

संदीप आडनाईक, कोल्हापूर: लोकप्रियतेच्या शिखरावर पोहाेचलेल्या आणि प्रत्येक वर्षी कमालीची उत्कंठा वाढविणाऱ्या ‘लोकमत’महामॅरेथॉनच्या कोल्हापुरातील सातव्या पर्वातील चौथ्या स्पर्धेत रविवारी राज्यभरातून आलेले हजारो स्पर्धक अगदी ‘मनमुराद’ धावले. या महामॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने बोचऱ्या थंडीतील प्रसन्न वातावरणात स्पर्धकांसह क्रीडा रसिक, शालेय विद्यार्थी, झांजपथकांनी एक सळसळता उत्साह निर्माण केला आणि हा क्षण एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवला. व्यावसायिक धावपटूंबरोबरच, हौशी धावपट्टूंचा विशेषत: महिला व लहान मुलांचा सहभाग लक्षवेधी ठरला.

उत्कंठावर्धक, लक्षवेधी, जोश, उत्साह अशा विशेषणांनी ‘लोकमत’चा हा इव्हेंट क्रीडा रसिकांच्या स्मरणात दीर्घकाळ राहतो. त्याचीच प्रचिती रविवारच्या महामॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा कोल्हापूरकरांना आली. ‘लोकमत’ने आवाहन करताच हजारो खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. ‘कर दे धमाल’ अशी यंदाची टॅगलाइन असलेल्या या स्पर्धेला क्रीडा रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. 

रविवारची पहाट कोल्हापूरकरांसाठी जोश, सळसळता उत्साह घेऊन आली. एरवी शांत असणारे रस्ते पहाटे साडेचार वाजल्यापासून खेळाडू, नातेवाईक, क्रीडा रसिकांच्या गर्दीने गजबजून गेले. त्यामुळे पोलिस कवायत मैदानावरील शांतता खेळाडूंच्या लगबगीने, ढाेल- ताशाच्या गजराने भंगली. मैदानावरील चैतन्यमय वातावरण पाहून खेळाडू, त्यांचे नातेवाईक भारावून गेले. ‘बिनधास्त’ धावण्यासाठी सज्ज झाले. प्रत्यक्ष धावण्यापूर्वी खेळाडूंनी गाणी तसेच संगीताच्या ठेक्यावर वॉर्मअप केला.
अखेर उत्कंठा संपली....
सकाळी सहा वाजता २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉनला उपस्थित मान्ववरांची झेंडा दाखविला. हाफ मॅरेथॉन ही व्यावसायिक धावपट्टूंसाठी असल्याने पाच...चार...तीन...दोन... एक असे म्हणत झेंडा दाखविताच क्षणाचाही विलंब न करता धावपट्टूंनी आपल्या लक्ष्याच्या दिशेने धाव घेतली. या गटात राज्यभरातील विविध शहरात होणाऱ्या महामॅरेथॉन स्पर्धेतील स्पर्धकही भोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यानंतर अर्ध्या तासाने दहा किलोमीटर पॉवर रनला सुरुवात झाली.
मान्यवरांची उपस्थिती
पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येरुडकर, डॉ. उद्धव भोसले (एमआयटी पुणे), गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, माजी चेअरमन विश्वास आबाजी पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित कदम, वारणा दूध संघाचे संचालक शिवाजी जंगम, राजवर्धन मोहिते, एन आर पाटील, अभिजित पाटील, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे, सिद्धीविनायक रुग्णालयाचे संचालक डॉ. संदीप पाटील, सुंदर बिस्किट्सचे संचालक विक्रम सेठीया, वितरक सेवाक्रम दुल्हणी,आयकाँन स्टीलचे संचालक उन्मेष राठी, भारत पाटील, गोकुळचे संचालक चेतन नरके, डॉ. मिलिंद हिरवे, संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, डॉ. मंजिरी देसाई,पार्वती स्टीलचे शाहू जाधव,  सोसायटी टीचे मार्केटिंग हेड क्षितिज तांडेल, सिध्दिविनायक हॉस्पिटलचे डॉ. संतोष पाटील, रेडिओ मिरचीचे आरजे मनिष आपटे, सहाय्यक उपाध्यक्ष मकरंद देशमुख, इव्हेंटचे महाराष्ट्र, गोव्याचे हेड रमेश डोडवाल, रेस डायरेक्टर संजय पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

हौशी धावपट्टूंनी वाढविली रंगत
स्पर्धेतील पाच किलोमीटर फन रन आणि तीन किलोमीटर फॅमिली रनमध्ये मोठ्या संख्येने स्पर्धकांनी भाग घेतला. या दोन्ही गटात तीन वर्षांपासून सत्तरी गाठलेल्या स्पर्धकांनी भाग घेताना ‘हम भी फिट है’ याची साक्ष देत धावले. या गटात अनेक कुटुंबातील आई, वडील, मुले असा एकत्रित भाग घेत धावण्याचा आनंद लुटला. कधी धावत, तर कधी चालत जात त्यांनी स्पर्धेचे अंतर पूर्ण करत उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेत शासकीय, महानगरपालिका, पोलिस विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही धावण्याचा मोह आवरला नाही. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही स्पर्धा पूर्ण करत आपली शारीरिक तंदुरुस्ती सिद्ध केली.
जोश वाढविणारे वातावरण
चारही गटातील स्पर्धेच्या मार्गावरील वातावरण जोश वाढविणारे होते. चौकाचौकात, प्रमुख रस्त्यावर झांजपथक, लहान मुलांचा बँडपथक, ढोल- ताशे पथक, लेझीम पथकातील वादकांनी वाद्यांचा दणदणाट करीत स्पर्धकांना ‘चीअरअप’ केले. फुले उधळत विद्यार्थ्यांनी तर ठिकठिकाणी मोठ्या संख्येने जमलेल्या क्रीडाशौकिनांनी टाळ्यांच्या गजरात प्रोत्साहित केले.

Web Title: Kolhapurkar ran in jubilation on Sunday morning; Great response to 'Lokmat Mahamarathon'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.